पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नवे नाव राजगड

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी, राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नामकरण राज्य सरकारने ” राजगड” असे केले आहे. याबाबतचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामकरणाचा निर्णय घेतल्याचे सांगून निर्णयाची सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले, राजगड या नावाचे ऐतिहासिक महत्त्व तसेच बेल्हे गावकऱ्यांची जिव्हाळ्याची मागणी लक्षात घेऊन राजगड नावाला केंद्र सरकारच्या गृह विभागाने ६ मे २०२५ रोजी मान्यता दिली. तत्पूर्वी, वेल्हे तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायती तसेच पुणे जिल्हा परिषदेने २२ नोव्हेंबर २०२१ रोजी नाव बदलाचा ठराव मंजूर केला. यावर ५ मे २०२२ रोजी पुणे विभागीय आयुक्तांनी आपला सविस्तर अहवाल शासनास सादर केला होता. १६ मार्च २०२४ रोजी नामबदलासंदर्भात शासनाने अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यावर कोणत्याच हरकती व सूचना प्राप्त झाल्या नाहीत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमितभाई शाह, मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांचे आभार मानून बावनकुळे यांनी सांगितले की, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील तरतुदीनुसार नाव बदलाचा अंतिम निर्णय घेण्यात आला.
छत्रपतींचा मावळा असल्याचा मला अभिमान असून,महसूलमंत्री म्हणून माझ्यासाठी हा निर्णय अतिशय आनंदाचा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच किल्ल्यावरून त्यांचे शासन केले होते. ऐतिहासिक वारश्याशीसंबंधीत हा निर्णय राज्यातील १४ कोटी जनतेसाठीही सुखद आहे. मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे यासाठी विशेष आभार मानतो.