मुंबईमहाराष्ट्र

आमदाराच्या आईला हार्ट अटॅक; शिंदे मदतीला धावले, एअर अॅम्ब्युलन्स पाठवली अन् स्वत: विमानतळावरही पोहोचले!

मुंबई: शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्यांच्या वैद्यकीय सेवेतील तत्परतेसाठी ओळखले जातात. एकनाथ शिंदे यांच्या याच संवेदनशीलतेचा अनुभव पुन्हा एकदा आला असून त्यांच्या तत्परतेमुळे शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्या आईचे प्राण वाचले आहेत. आमदार बांगर यांच्या आईला हृदयविकाराचा त्रास होत होता. शिंदे यांनी तातडीने एअर अॅम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि त्यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू झाले.

मिळालेल्या माहितीनुसार, आमदार संतोष बांगर यांच्या आई, वत्सलाबाई बांगर यांना शनिवारी रात्री हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या हृदयात ब्लॉकेजेस होते. त्यामुळे हिंगोलीतील डॉक्टरांनी वत्सलाबाई बांगर यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्याचा सल्ला दिला. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना रस्तेमार्गे मुंबईत आणणं जोखमीचं ठरलं असतं. त्यामुळे आमदार बांगर यांनी लगेच एकनाथ शिंदे यांना फोन केला.
संतोष बांगर यांच्याशी फोनवरून संभाषण झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्वरित प्रतिसाद दिला. त्यांनी नांदेडला विशेष एअर अॅम्ब्युलन्स पाठवली. आमदार बांगर त्यांच्या आईला घेऊन ही अॅम्ब्युलन्स मुंबईला आली. तेव्हा मुंबई विमानतळावर एकनाथ शिंदे स्वतः विमानतळावर वत्सलाबाई बांगर यांना भेटायला आले. त्यांनी वत्सलाबाई यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यास सांगितले.
आपल्या नेत्याच्या तत्परतेमुळे आईवर वेळीच उपचार सुरू झाल्याने आमदार संतोष बांगर भावनिक झाले. आमदार बांगर म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांनी एअर अॅम्ब्युलन्स उपलब्ध करून दिल्यामुळे माझ्या आईचे प्राण वाचले. मी त्यांचा आभारी आहे.”
दरम्यान, या घटनेनंतर एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. “प्रत्येक शिवसैनिक माझ्यासाठी कुटुंबासारखा आहे. मी माझ्या कर्तव्य भावनेतून ही मदत केली,” असं शिंदे यांनी म्हटलं आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!