मुंबई विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा :शासन सहकार्य करेल
मुंबई विद्यापीठात शिवशौर्यगाथा पोवाडा गायन स्पर्धेचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उदघाटन

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व होते. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून संपूर्ण भारतासाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी निर्माण केलेले स्वराज्य लोकशाही, न्याय, समता आणि प्रशासनाची आदर्श संकल्पना होती.त्यांचे शौर्य व कार्याची गाथा भविष्यातील पिढ्यांसाठी मार्गदर्शक, प्रेरणादायी आहे.त्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारावा यासाठी राज्य शासन सर्वतोपरी सहकार्य करेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त शिवशौर्यगाथा” पोवाडा गायन स्पर्धेचे उद्घाटन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्या हस्ते करण्यात आले.
उद्घाटन समारंभास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी, प्र-कुलगुरू प्रा. डॉ. अजय भामरे, प्रा. डॉ. बळीराम गायकवाड, कुलसचिव डॉ. प्रशांत कारंडे आणि विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा म्हणाले, शिवजयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा जागर घडवण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत शिवचरित्र जागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच अनुषंगाने, उद्या पुण्यात केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांच्या उपस्थितीत भव्य वॉकॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. ही वॉकॅथॉन सीओईपी कॉलेजपासून फर्ग्युसन कॉलेजपर्यंत निघणार असून, यात सुमारे 15 हजार युवक-युवतींचा सहभाग राहणार आहे.
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून आणि , व्यवसायाभिमुख शिक्षणावर अधिक भर दिला आहे. त्याच बरोबर परंपरेचा अभिमान बाळगून जगणे हे सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रशासन, करप्रणाली, लोककल्याणकारी योजना,ध्येय धोरणे,अशा अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावरचा अभ्यासक्रम चार वर्षांच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करता येईल का यावर विचार व्हावा, असेही मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितले.
मुंबई विद्यापीठानेही या उपक्रमात मोठा सहभाग नोंदवला आहे. विद्यापीठाच्या 368 महाविद्यालयांमधून तब्बल 8,312 विद्यार्थ्यांनी शिवचरित्रावर आधारित पोवाडा स्पर्धेत भाग घेतला. या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी शिवरायांचे पराक्रम, शौर्य आणि प्रशासन कौशल्य यांचे दर्शन घडवले. राज्यस्तरावर या स्पर्धेतील अंतिम फेरी होऊन प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक जाहीर करण्यात येणार आहेत.
पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना विशेष बक्षिस
या बक्षीसा व्यतिरिक्त पाच हजार गाण्याचा समावेश असलेला कारवा या स्पर्धेत पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून देण्यात येणार आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि कार्य जनमानसात पोहचवणे आणि ही स्पर्धा म्हणजे शिवचरित्राच्या अभ्यासाची संधी आहे. या कार्यक्रमादरम्यान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत होमिभाभा विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठ यांच्यात दुहेरी पदवी संदर्भात सामंजस्य करार करण्यात आला.