महाराष्ट्रमुंबई

व्याख्यानमालांमधूनच आम्ही घडलो ; भाजप नेते गोपाळ शेट्टी आणि कॉंग्रेस नेते संदेश कोंडविलकर यांनी व्यक्त केली कृतज्ञता ; रुचिरा दिघे, हेमंत पाटकर आणि सचिन वगळ पुरस्काराने सन्मानित

मुंबई : ४२ वर्षांपूर्वी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांनी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला सुरु केली. ही व्याख्यानमाला यापुढेही सुरु ठेवली ही अतीशय अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. आम्ही सुद्धा एकदम आमदार खासदार झालेलो नाही, अशा व्याख्यानमालांमधूनच आम्हीही घडलो. २५/२५, ५०/५० तरुण गोळा करून सतरंज्यांवर बसून आम्ही व्याख्यानमाला ऐकल्या आहेत. त्यातूनच आम्ही समाजात कसे वागायचे, वावरायचे हे शिकलो. विजय वैद्य यांनी सुरु केलेली जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला यापुढे अविरत सुरु ठेवण्यासाठी मी, विनोद घोसाळकर, संदेश कोंडविलकर आणि सर्व सहकारी आपल्या पाठीशी सदैव उभे राहू, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते, माजी खासदार गोपाळ शेट्टी यांनी जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेत प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना अभिवचन दिले. तसेच त्यांनी विजय वैद्य यांच्या कार्याचा गौरव करतांनाच जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमाला कार्यकर्त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. यावेळी गोपाळ शेट्टी आणि मुंबई विभागीय कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ॲड. संदेश कोंडविलकर यांच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिक संघ, बोरीवली (पूर्व) या संस्थेच्या अध्यक्षा रुचिरा दिघे यांना शारदा पुरस्कार, मागाठाणे मित्र मंडळाचे खंदे कार्यकर्ते हेमंत पाटकर यांना जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. या व्याख्यानमालेचे गेली ४३ वर्षे अविश्रांत परिश्रम घेऊन पडेल ती सर्व जबाबदारी लीलया पार पाडणारे कार्यकर्ते सचिन वगळ यांना देण्यात आलेल्या जय महाराष्ट्र नगर भूषण पुरस्काराचे मानपत्र गोपाळ शेट्टी यांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. ॲड . संदेश कोंडविलकर यांनी विजय वैद्य आणि अनिल जोशी या ज्येष्ठ पत्रकारांच्या मार्गदर्शनाखाली आपणही संवाद व्याख्यानमाला सुरु केली असल्याचे आवर्जून नमूद केले. प्रा. सौ. नयना रेगे यांनी अत्यंत खुमासदार शैलीत सूत्रसंचालन केले. श्रीमती वैशाली विजय वैद्य, शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई, बॅंक कर्मचाऱ्यांचे नेते राजन नेरुरकर, भारतीय कामगार सेनेचे माजी पदाधिकारी देवराम भोसले, शाखाप्रमुख अभिलाष कोंडविलकर, ताडदेवच्या जनता केंद्राचे विश्वस्त दिनेश राणे, एअर इंडियाच्या सेवानिवृत्त अधिकारी मीना नाईक, उद्योजक विजय घरटकर, वसंत सावंत, सुभाष देसाई, चित्रकार मनोज सनान्से, रोहिणी चौगुले, कांचन सार्दळ, यांच्या सह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक संघाचे अनेक सदस्य यावेळी आवर्जून उपस्थित होते. ख्यातनाम गायिका संगीता मिरकर यांच्या सुमधुर आवाजातील पसायदान आणि राष्ट्रगीताने जय महाराष्ट्र नगर वसंत व्याख्यानमालेची सांगता झाली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!