आश्चर्यकारक! दिल्लीत आढळली ब्रिटिशकालीन फाशी देण्याची खोली

नवी दिल्ली – दिल्ली विधानसभेच्या आवारात दोनच महिन्यापूर्वी ब्रिटिशकालीन बोगदा सापडला होता. आता या ऐतिहासिक बोगद्यापाठोपाठ आता याच वास्तूत ब्रिटिशकालीन फाशीची खोलीही आढळली आहे. त्यामुळे या वास्तूकडे सर्वांचेच लक्ष वेधले गेले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार 1912 मध्ये ही वास्तू बांधण्यात आली आहे. ही ऐतिहासिक रहस्यमय खोली आणि बोगदा लवकरच पर्यटकांसाठी खुला करण्यात येईल, असं दिल्ली विधानसभेचे सभापती राम निवास गोयल यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
या वास्तूच्या दुरुस्तीचं काम सुरू असताना काही कामगारांना (Workers) या रहस्यमय खोलीचा शोध लागला आहे. ब्रिटिश राजवटीत त्यांची राजधानी कोलकात्याहून दिल्लीत स्थलांतरित झाल्यानंतर १९१२ मध्ये ही भव्य वास्तू बांधण्यात आली. १९१३ ते १९२६ या कालावधीत या इमारतीमध्ये मध्यवर्ती संसदेचे कामकाज चालत असे. १९२६ नंतर ही इमारत संसद म्हणून वापरणं बंद करण्यात आलं.
तेव्हा ब्रिटिश प्रशासकांनी या इमारतीचे रूपांतर न्यायालयात केले आणि इथं क्रांतिकारकांच्या खटल्यांची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला. त्या काळात क्रांतिकारकांना लाल किल्ल्यावरून इथं आणण्यासाठी इथल्या बोगद्याचा वापर केला जात होता, अशी माहिती राम निवास गोयल यांनी दिली आहे.