राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्याचा निर्णय – पालकमंत्री उदय सामंत

रत्नागिरी : मराठी भाषा गौरव दिन व कवी कुसुमाग्रज जयंती उत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर नाट्यगृह, रत्नागिरी येथे राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत ह्यांनी उपस्थिती दर्शवली .यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर रत्नागिरीमधील शिरगाव येथे स्थानबद्ध असलेल्या घटनेला १०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल त्यांच्या आठवणींना उदय सामंत ह्यांनी उजाळा दिला. सावरकर ज्या दामले कुटुंबीयांकडे राहत होते, त्या सर्व दामले कुटुंबीयांचा या कार्यक्रमात उदय सामंत ह्यांच्या हस्ते जाहीर सन्मान करण्यात आला.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त आयोजित हा कार्यक्रम दरवर्षी राज्य शासनाच्या वतीने साजरा केला जाईल. तसेच, राज्याचा मराठी भाषा मंत्री म्हणून मला मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे भाग्य लाभले, यासाठी मी केवळ आणि केवळ रत्नागिरीकरांचा ऋणी आहे. त्यांनी मला सलग पाच वेळा विधानसभेत निवडून पाठवले, ही माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. याबद्दल उदय सामंत ह्यांनी समस्त रत्नागिरीकरांचे जाहीर आभार मानले.