NCC – एका वर्षाचा प्रवास ( २०२४ – २५)

मुंबई : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळ ही गोरेगावातील एक जुनी (१२ मार्च १९५०) शिक्षण संस्था. सन १९६३ मध्ये मंडळाने मराठी माध्यमाची माध्यमिक शाळा ‘अभिनव विद्यालय’ या नावाने सुरू केली. १९६६ मध्ये या माध्यमिक शाळेसाठी स्वतंत्र इमारत बांधण्यात आली व शाळेचे ‘ नंदादीप विद्यालय ’ असे नामांतरण करण्यात आले. शाळेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षात म्हणजे २०१२ साली मोठे संमेलन झाले. अनेक माजी विद्यार्थी आणि आजी – माजी शिक्षक त्यानिमित्ताने भेटले. अनेक वर्ष मुख्याध्यापक म्हणून काम केलेले अरविंद वैद्य सर (ऐशीच्या दशकात सरांनी शाळेला एक नवी उंची प्राप्त करून दिली) आणि काही माजी विद्यार्थ्यांच्या संकल्पनेतून ” नंदादीपीय फाउंडेशन ” ही संघटना, मुंबई धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणीकृत करण्यात आली.
या संघटनेमार्फत अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाच्या गरजू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मॉडरेटर व्याख्यानमाला, motivational speech, कायदेविषयक कार्यक्रम असे विविध उपक्रम आयोजित केले गेले.
” आठवणीतल्या साठवणी ” ( वैद्य सर मुख्याध्यापक असतानाचे त्यांचे अनुभव त्यांच्या पुस्तकात खूप छान लिहिले आहेत) या पुस्तकाचे प्रकाशन मुंबईचे माजी महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते माजी विद्यार्थी संघटनेने केलं होतं.
महाराष्ट्र क्लास ओनर्स असोसिएशन या कोचिंग क्लासेस संघटनेने त्याचे इंग्लिश भाषांतर करून ते पुस्तकही प्रकाशित केलेल आहे.
२७ एप्रिल २०२४ रोजी नंदादीप विद्यालयाच्या हिरक महोत्सवानिमित्त झालेल्या संगीत कार्यक्रमात *NCC – _नंदादीपीय कराओके क्लबची स्थापना झाली. या कराओके क्लबद्वारे नंदादीप विद्यालयाचे वेगवेगळ्या वयोगटातील ( अगदी ७० वर्षापर्यंत) माजी विद्यार्थी आपली कला सादर करतात. या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणून विविध कार्यक्रम करण्यासाठी संतोष वासकर (१९७९ बँच ) प्रचंड मेहनत घेत असतो. गाण्याच्या प्रॅक्टिससाठी त्याच्या घराचे दरवाजे कायम उघडे असतात. प्रॅक्टिसला येणारे आपापल्या परीने खानपानाची व्यवस्था करतात. NCC ने गेल्या वर्षात एकूण ७ कार्यक्रम केलेले आहेत. स्वतःच शुल्क काढून माजी विद्यार्थी कार्यक्रम करतात, ज्यामुळे संस्थेवर कुठलाही आर्थिक बोजा पडत नाही.
नंदादीपीय कराओके क्लबला १ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ११ मे रोजी पंचम एक्सप्रेस हा R. D. Burman यांनी स्वरबद्ध केलेल्या हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम नंदादीप विद्यालयाच्या कलाघरात आयोजित केला होता. कलाघर हाऊसफुल्ल होते (३५० च्या आसपास गोरेगावातील रसिक मंडळी उपस्थित होती)
विशेष म्हणजे हिंदी चित्रपट सृष्टीतील प्रख्यात पार्श्वगायिका श्रीमती अनुपमा देशपांडे , गोरेगावकर व प्रसिद्ध हार्मोनियक वादक श्री अजय जोगळेकर अशा मान्यवनांचे आशीर्वाद ह्या कार्यक्रमाला लाभले.
गोरेगावातील विविध सांस्कृतिक मंडळाचे प्रतिनिधी सुद्धा आवर्जून उपस्थित होते.