दिंडोशी रस्त्यांचे सिमेंटकरणाला सुरुवात; पहिल्या टप्प्यात १५ पैकी ५ रस्त्यांचे काम पूर्ण
मुंबई: दिंडोशीतील रस्त्यांचे रुपडे काँक्रीटीकरणाचे काम प्रगतीपथावर असून येथील १५ रस्त्यांपैकी ५ रस्त्यांचे सिमेंट काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे. उर्वरित रस्त्यांची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण होतील अशी माहिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते, दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांनी दिली. पूर्वी येथील रस्त्यांची अवस्था दयनीय होती, पावसाळ्यात तर खड्यात रस्ते, रस्त्यात खड्डे अशी स्थिती होती. याप्रकरणी आपला पाठपुरावा आणि पालिका प्रशासनाचे सहकार्य यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले. येथील पाच रस्त्यांचे रुपडे पालटल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. येथील खातुशाम मंदिर रस्ता, साई मंदिर ते आंबेडकर चौक रस्ता, संकल्प सोसायटी रस्ता, बसुवाला कॉलनी रोड, संतोषी माता रोड या पाच सिमेंट काँक्रीटीकरणाची कामे पूर्ण झाली आहेत. येथे वाहने आता खड्डेमुक्त रस्त्यातून सुसाट जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
दिंडोशीचे आमदार सुनील प्रभू यांचा पुढाकार
येथील रस्ते सिमेंट काँक्रीटीकरण करा यासाठी आपण विधानसभेत आवाज उठवून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या बरोबर बैठक घेतली. त्यांच्या सूचने नुसार पालिका आयुक्त भूषण गगराणी यांच्याकडे देखिल बैठक झाली. अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) अभिजित बांगर तसेच परिमंडळ ४ चे तात्कालीन सहआयुक्त विश्वास शंकरवार, विद्यमान उपायुक्त डॉ. भाग्यश्री कापसे, पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्याकडे पाठपुरावा केला. यामुळेच हे शक्य झाल्याचे आमदार सुनील प्रभू यांनी सांगितले.
कामावर बारीक लक्ष
येथील रस्त्यांची कामे वेळेत होण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपविभागप्रमुख, शाखाप्रमुखांनी आणि आपण स्वतः रात्री येथील कामावर जातीने देखरेख ठेवली. येथील रस्त्यांच्या कंत्राटदारांकडून खंडणी मागणाऱ्या गाव गुंडाचा देखिल पोलिसांकडून बंदोबस्त केला अशी माहिती आमदार प्रभू यांनी दिली.