मुंबई

शिवसेनाप्रमुखांची निशाणी मशाल घराघरात पोहोचवा – उद्धव ठाकरे

मुंबई – ही निवडणूक सोपी नाही. जे गद्दार आहेत ते नुसते गद्दार नाहीत, ते धनुष्यबाण आणि मशाल असा संभ्रम निर्माण करतात. म्हणूनच शिवसेनाप्रमुखांची निशाणी मशाल आहे, ती आतापासून आपल्याला घराघरात पोहोचवायची आहे, असे आवाहन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आमदार दीपक साळुंखे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी जात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. त्यावेळी ठाकरे बोलत होते.

ठाकरे यांच्यावर गेल्या आठवड्यात अँजिओप्लास्टीची झाली. त्यानंतर ते आता पुन्हा एकदा सक्रीय होऊ लागले आहेत. आजारपणातून बाहेर पडल्यानंतर ठाकरे आज पहिल्यांदा कार्यकर्त्यांसमोर आले. दीपक साळुंखे यांची सांगोल्यात ताकद आहे. त्यामुळे त्यांना कदाचित सांगोल्यातून ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर होण्याची शक्यता आहे. तसे संकेत ठाकरे यांनी दिले. दीपक आबा आले म्हटल्यावर विजय नक्की हे मला माहिती आहे. मग मी असं म्हणतो की, विजयच होणार असेल, तर मी सभेला आलोच नाही तर? म्हणजे आलो पाहिजे ना? मग तुम्ही काय केलं पाहिजे? तुम्ही आजपासून पूर्ण मतदारसंघात घराघरात आपली मशाल पोहोचवली पाहिजे.

दसऱ्यानंतर आज पहिल्यांदा मी तुमच्यामध्ये आलेलो आहे. मधल्या काळात हॉस्पिटलची एक वारी करावी लागली. डॉक्टर म्हणाले आराम करा, पण आता आराम करायचा तरी किती? आधी हरामांना घालवायचं आहे. त्यामुळे आता आराम नाही. पण आज कामाला सुरुवात केली. मुहूर्त चांगला लाभला आहे. आबासाहेब मजबूत गडी ते शिवसेना परिवारात सामील झाले आहेत. आबा तुमच्या हातात मशाल दिलेली आहे. त्याचा अर्थ ज्याने त्याने समजून घ्यावा. आता ही मशाल कशी पेटवायची आणि कुणाला चटके द्यायचे हे तुम्ही ठरवायचं आहे. मी सभेला येईल तेव्हा विस्ताराने बोलेनच. तूर्तास मी तुमचं पक्षात स्वागत करतो. तुमच्याकडून म्हणजे माझा सांगोल्याचा आमदार जो निवडून आला होता तो जरी गद्दार झाला तरी सांगोलेकर माझ्यासोबत आहेत हे तुम्ही दाखवून द्यायचं आहे. मला खात्री आहे की, तुम्ही या शब्दाला जागाल आणि आपला आमदार निवडून आणाल. जिंकून आणल्यानंतर परत एकदा येईन. तोपर्यंत शुभेच्छा देतो, असेही ठाकरे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!