कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीची धडक बसून एका बिबट्याचा मृत्यू

कोकण: कोकण रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या मालगाडीची धडक बसून एका बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना कसाल-कार्लेवाडी येथे बुधवारी पहाटे 4 ते 4.30 वा.च्या सुमारास घडली. मालगाडीच्या धडकेने बिबट्या गंभीर जखमी होऊन रेल्वे ट्रॅक नजिकच्या झुडपामध्ये लपला होता.रेल्वे सुरक्षा बल व वनविभाग कर्मचाऱ्यांनी त्याला जेरबंद करून पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
पहाटे 4.30 वा.च्या सुमारास सदर घटना निदर्शनास आल्यानंतर मालगाडीच्या मोटरमनने कणकवली रेल्वे स्टेशन मास्तर आनंद चिपळूणकर यांना माहिती दिली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे निरीरक्षक राजेश सुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक उपनिरीक्षक दुर्गेश यादव, हवालदार अनंत मेलशिंगरे आदी कसाल-कार्लेवाडी येथे दाखल झाले. मात्र बिबट्या दिसत नव्हता त्यामुळे कर्मचाऱ्यांनी झुडपांमध्ये छोटे दगड मारले असता एका झुडपातून बिबट्याच्या गुरगुरण्याचा आवाज आला. वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर सकाळी 6.30 वा. च्या सुमारास बिबट्याला जेरबंद करण्यात आले. त्याच्या डोक्याला, पाठीला गंभीर दुखापत झाली होती. बिबट्याला तत्काळ कुडाळ येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले होते. मात्र बिबट्याचा मृत्यू झाला.