मुंबईमहाराष्ट्रराष्ट्रीयविदर्भ

राष्ट्रसंतांच्या भूमीत योगींची भाषा विष पेरणारी-मल्लिकार्जुन खरगे

आपल्या खास शैलीत घेतला विरोधकांचा समाचार

काँग्रेसचे देशासाठी बलिदान आणि योगदान सर्वश्रुत

जाहीर सभेत नागरिकांची अलोट गर्दी

गुरुकुंज मोझरी/प्रतिनिधी
जगाला सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे आणि ग्रामगीतेतून देशात एकता निर्माण करणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या भूमीत ‘बटेंगे तो कटेंगे’ सारख्या विषारी घोषणा देणाऱ्या योगींच्या तोंडून अशी भाषा शोभत नाही.योगी म्हणजे मुखात राम आणि बगल मध्ये सुरी अशी लक्षणे तर ढोंगी साधूंची असल्याचा पलटवार अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. गुरुदेवनगर गुरुकुंज मोझरी येथे शनिवारी यशोमती ठाकूर यांच्यासह महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी मोहन प्रकाश, खा. बळवंत वानखडे,माजी खा. अनंत गुढे,तिवसा येथील महाविकास आघाडीच्या उमेदवार यशोमती ठाकूर, डॉ. सुनील देशमुख (अमरावती विधानसभा) प्रा. वीरेंद्र जगताप (धामणगाव रेल्वे विधानसभा),डॉ.हेमंत चिमोटे (मेळघाट विधानसभा),बबलू देशमुख (अचलपूर विधानसभा) गिरीश करळे (मोर्शी, वरुड विधानसभा) सुनील खराटे (बडनेरा विधानसभा),गजानन लेवटे (दर्यापूर विधानसभा) यांचेसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

यावेळी विरोधकांचा खरपूस समाचार घेतांना खरगे म्हणाले की, राष्ट्र एकसंघ राहण्याकरिता प्रयत्न करणाऱ्या काँग्रेसचे मोठे बलिदान आहे. आरएसएस, भाजपने स्वातंत्र्यासाठी काय केले, भारताचा इतिहास लक्षात घेता काँग्रेसचे योगदान आणि बलिदान दिसून येते.इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आम्ही संविधानावर चालणारे लोकं आहोत मात्र विरोधकांची भाषा संविधान तोडणारी मनुस्मृती भाषा आहे.जुमलेबाज मोदी सरकारने ना पंधरा लाख दिले नाही वर्षाला दोन कोटी नोकऱ्या दिल्या,ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले. याउलट शेतीमालाचे भाव कमी झाले, बेरोजगारी वाढली, देशात अराजकता निर्माण केली.काँग्रेसने संविधान वाचवून लोकशाही जिवंत ठेवल्यामुळे आज मोदी प्रधानमंत्री झाले असे सांगून खरगे यांनी आज संविधान वाचविण्याची गरज असल्याचे नमूद केले.

संविधान असेल तर देशातील नागरिकांचे हक्क सुरक्षित आहेत त्यामुळे तोडण्याची भाषा करणाऱ्या व मनुस्मृतीवर चालणाऱ्या लोकांना त्यांची जागा दाखवून द्या व महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले. गुरुकुंज मोझरी येथे झालेल्या जाहीर सभेला महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेला नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी होती. या सभेने विरोधकांचे धाबे दराने अशी चर्चा सभास्थळी होती.

ये शेरनी है,किसिसे डरती नही
महाविकास आघाडीच्या उमेदवार व काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर या चवथ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येतील. त्यांनी मतदार संघात विविध योजना आणून सर्वच क्षेत्राचा विकास केला. त्या अतिशय योग्य उमेदवार असून यापुढेही त्या तुमच्या सेवेत राहून उत्तम काम करतील. तुमचा आशीर्वाद देऊन व तुमच्या मतांचा योग्य वापर करून यशोमती ठाकूर यांना निवडून द्या.यशोमती ठाकूर या नुसत्या उमेदवार नाहीत तर त्यांचे काँग्रेस पक्षासाठीही मोठे योगदान आहे. त्यांचे कामच त्यांचा धर्म आहे, लढाऊ महिला म्हणून त्या सर्वश्रुत असतांना ये शेरनी है किसिसे डरती नही असे म्हणत यशोमती ठाकूर यांचे भरभरून कौतुक केले.

नेत्यांनी मर्यादा जपावी
उठसुठ कुणीही काहीही बोलतात, पदाची गरीमा न ठेवता तसेच पक्षाची विचारसरणी झुगारून आज मोदींपासून ते स्थानिक नेत्यांपर्यंत विषारी भाषेचा वापर करतात. काल, परवा येथील एका मुलीने खासदाराला चपराशी संबोधले.यावरून त्यांच्या संस्काराची प्रचिती येते. बळवंत वानखडे यांना संविधानाने खासदार बनविले. बळवंत वानखडे हे जनतेचे, देशाचे, महापुरुषांचे शिपाई आहेत. उलट असे वक्तव्य करणाऱ्यांनी स्वतः अवलोकन करावे असे बोलल्यानेच आपण एकदा जेलवारी सुद्धा केलेली आहे त्यामुळे आपण भाषेचा योग्य वापर करावा व बोलतांना, काम करतांना आपली मर्यादा जपावी असा इशारा देत मल्लिकार्जुन खरगे यांनी नवनीत राणा यांना मर्यादेत राहण्याचा सल्ला दिला.

हे फसनवीस सरकार-यशोमती ठाकूर
विद्यमान राज्यसरकारने जनतेची फसवणूक केली आहे.हे केवळ मतांसाठी शासनाच्या तिजोरीचा वापर करत असून फसव्या योजना राबवित आहेत. महिला असुरक्षित असून युवक बेरोजगार झालेत, शेतीमालाला भाव न देता त्यांचीही फसवणूक केली. शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या चिंतनाचा विषय आहे. वाढत्या महागाईने सर्वसामान्य जनता हवालदिल झाली आहे आणि हे फसनविस सरकार लोकांना जातीपातीच्या राजकारणात अडकवून ठेवत आहे.
खोटे आमिषे दाखवून युवकांना फसविण्याचे प्रकार हे सरकार करत आहे अशी टीका करून यशोमती ठाकूर यांनी महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर सर्व समस्यांवर निघेल असे उपस्थितांना आश्वासन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!