कोंकणमहाराष्ट्रमुंबईवाहतूक

गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेसचा डबल धमाका….

मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांना गणपतीसाठी मोफत रेल्वेसेवा

मुंबई, १३ ऑगस्ट २०२५: गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई व मुंबई परिसरातील चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे याहीवर्षी मोदी एक्स्प्रेस गणपती स्पेशल विशेष ट्रेन सोडण्यात येत आहेत. कोकणवासीयांसाठी हि दिलासादायक बाब आहे. महत्वाचे म्हणजे ह्या उपक्रमाचे हे १३ वे वर्ष असून यंदा कोकणवासीयांच्या सेवेसाठी विशेष दोन ट्रेन सज्ज होणार आहेत. अशी माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

कोकणवासीय गणेशभक्तांना गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी मंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून गणपती स्पेशल मोदी एक्स्प्रेस विशेष रेल्वे सेवा गेली १२ वर्षे अविरतपणे नागरिकांच्या सेवेत आहे. परंतु यंदा हि सेवा स्पेशल असून दोन ट्रेन नागरिकांच्या सेवेत सज्ज होणार आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनतेने भारतीय जनता पार्टी आणि राणे कुटुंबियांना भरभरून दिले आहे. तसेच कणकवली, देवगड आणि वैभववाडी च्या जनतेने तिसऱ्यांदा लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे. त्यामुळे यावर्षी कोकणवासीयांच्या सेवेसाठी २ विशेष ट्रेन सोडणार असून सर्व प्रवासी भक्तांसाठी मोफत जेवण व पाण्याची व्यवस्था असल्याची माहिती मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.

दिनांक २३ व २४ ऑगस्ट २०२५ अशा दोन दिवशी सकाळी ११ वाजता दादर रेल्वे स्थानकावरून ह्या रेल्वे सुटणार आहेत. याचे तिकीट वाटप सोमवार दिनांक १८ ऑगस्ट २०२५ पासून सुरु होणार आहे. तिकिटासाठी नागरिकांनी आपापल्या मंडळ अध्यक्षांकडे नाव नोंदणी करायची आहे. शनिवार दिनांक २३ ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन रत्नागिरी आणि कुडाळ ला थांबेल, या गाडीचा अंतिम थांबा सावंतवाडी असेल. तसेच रविवार २४ ऑगस्ट रोजी दादर रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक १४ वरून सकाळी ११ वाजता सुटणारी ट्रेन वैभववाडी व कणकवली येथे थांबेल. या डबल धमाका स्पेशल मोदी एक्स्प्रेस चा लाभ सर्व कोकणवासीयांना घ्यावा असे आवाहन मंत्री नितेश राणे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!