मोती तलावा मधील ती मगर जेरबंद, क्रोकोडाईल मॅन’ बबन रेडकर यांचा 364 मगरी पकडण्याचा विक्रम !

कोकण: सावंतवाडीच्या मोती तलावातील मगर अखेर पकडण्यात यश आलं आहे. या मोहिमेचे नेतृत्व क्रोकोडाईल मॅन’ म्हणून ओळखले जाणारे बबन रेडकर यांनी केले. त्यांच्या नेतृत्वाखालील वनविभागाच्या जलद कृती दलाने हे अवघड काम यशस्वी करून दाखवले. विशेष म्हणजे, ही मगर त्यांच्या आयुष्यातील 364 वी मगर आहे.
वनसेवक म्हणून 42 वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर गेल्या वर्षी निवृत्त झालेले बबन रेडकर यांचा अनुभव आणि कौशल्य आजही वन्यजीव संरक्षणासाठी मोलाचं ठरत आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी तत्कालीन वनक्षेत्रपाल सुभाष पुराणिक यांच्याकडून वन्य प्राण्यांना वाचवण्याचं विशेष प्रशिक्षण घेतलं.
रेडकर यांचा ‘वन्यजीव रेस्क्यू प्रवास
वनविभागात दाखल झाल्यापासून त्यांनी अनेक वन्य प्राण्यांना जीवदान दिलं आहे. यात विविध प्रकारचे साप, बिबटे, अजगर, आणि नाग यांचा समावेश आहे. त्यांची ही कामगिरी पाहून निवृत्तीनंतरही त्यांची जलद कृती दलाचे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली.
उपवनसंरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या ते आपली टीम घेऊन काम करत आहेत. या बचाव कार्यात त्यांना प्रथमेश गावडे, शुभम कळसुलकर, शुभम फाटक, पुंडलिक राऊळ, आनंद राणे, देवेंद्र परब आणि राकेश अमृसकर या त्यांच्या टीममधील सदस्यांची मोलाची साथ लाभली आहे. बबन रेडकर यांच्या या कार्यामुळे वन्यजीव संरक्षण आणि मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी त्यांच्या कामाचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.