राज्य प्राणी शेकरूंची संख्या स्थिर, घोरपडी होताहेत झपाट्याने कमी

महाराष्ट्र: गेल्या दहा वर्षांत राज्यातील घोरपडींची संख्या झपाट्याने कमी झाली आहे. मात्र, महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरूची संख्या गेल्या तीन वर्षांत केलेल्या गणनेनुसार स्थिर आहे. राज्यातील विविध वनपरिक्षेत्रातील अधिकाऱ्यांनी प्रसिद्ध केलेली सांख्यिकी आणि वन्यजीव अभ्यासकांच्या निरीक्षणातून ही माहिती समोर आली आहे. कधी खाण्यासाठी, तर कधी अंधश्रद्धेतून घोरपडींच्या विविध अवयवांची अवैध विक्री यामुळे या वन्यजीवांच्या अस्तित्त्वाला धोका निर्माण झाला आहे. परिणामी, त्यांच्या संवर्धनासाठी वन्यजीव परिक्षेत्र विभागासह सर्वत्र अधिक जोरकसपणे लोकजागृती करण्याची गरज अभ्यासक व्यक्त करत आहेत.
खारीच्या प्रजातीचा शेकरू हा प्राणी महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. तो सदाहरित व निम्नहरित जंगलांमध्ये उंच झाडावर घरटे करून राहतो. मात्र, एका सर्वेक्षणानुसार याबद्दल ७० टक्के लोकांमध्ये अनिभज्ञता दिसून आली. सांगली, सातारा, कोल्हापूर, सातपुडा पर्वतरांग, नाशिकजवळील भंडारदरा – हरिश्चंद्रगड वन्यजीव अभयारण्यात याचा अधिवास आहे. गेल्या तीन वर्षांत या प्राण्याची संख्या स्थिर असल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मात्र, घोरपडींची संख्या झपाट्याने कमी झाल्याचे निरीक्षणही वन्यजीव अभ्यासकांनी नोंदवले.