मंत्री नितेश राणे यांचा राज्यासाठी घेतलेला तो निर्णय देशभरात लागू होण्याची शक्यता

रत्नागिरी : पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय क्षेत्राला शेतकऱ्यांप्रमाणेच आर्थिक फायदे मिळावेत या उद्देशाने राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळण्याच्या हालचाली सुरू आहेत, मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागाला कृषिचा दर्जा दिला होता, या निर्णयाची दखल केंद्र सरकारने घेतली असून लवकरच तो निर्णय संपूर्ण देशभर लागू होण्याची शक्यता आहे.
केंद्र सरकारने राज्य सरकारकडून या निर्णयाची सविस्तर माहिती मागविली आहे. तसेच देशभरात याची अंमलबजावणी करण्यासाठी सूचना व अभिप्राय मागविण्यात आले आहेत. याबाबत कृषि, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय विभागाच्या मंत्रिमंडळ गटाची लवकरच बैठक होणार आहे. कृषी, पशुसंवर्धन आणि मत्स्य व्यवसाय हे राज्य सरकारच्या अखत्यारितील विषय असले तरी केंद्र सरकार ढोबळ मार्गदर्शक तत्वे देवून विचार करत आहे. यानुसार राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांना आवश्यक कायदे करावे लागतील. या निर्णयामुळे पशुपालक आणि मच्छिमार यांना आर्थिक स्थैर्य मिळेल आणि त्यांच्यासमोर नवे विकासाचे मार्ग खुले होतील.