महाराष्ट्रमुंबई

हवामान खात्याचा अंदाज: राज्यात काही भागात पुन्हा पावसाचा जोर!

मुंबई : बंगालच्या उपसागरात या आठवड्यात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामानात मोठा बदल होण्याची चिन्हे असून पुढील ४८ ते ६० तासांत विदर्भ व महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्याचबरोबर कोकणातही पुढील पाच दिवसांत पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. काही भागात पाऊस कोसळत आहे तर काही भागात पावसाने उघडीप दिल्याने तापमानाचा पारा वाढला आहे. या आठवड्यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विदर्भ तसेच इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

मुंबईतही पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. कोकण तसेच मध्य महाराष्ट्रात अधूनमधून पाऊस पडत होता. मात्र, विदर्भ आणि मराठवाड्यात गेले काही दिवस पाऊस पडलेला नाही. परिणामी तेथील तापमानात वाढ झालेली आहे. तसेच मध्य प्रदेश आणि परिसरावर समुद्र सपाटीपासून १.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. याचबरोबर विदर्भापासून उत्तर कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. ब्रम्हपुरी येथे रविवारी सर्वाधिक तापमानाची नोंद झाली. तेथे ४३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. दरम्यान, या पावसामुळे उकाड्याने त्रस्त असलेल्या राज्यातील अनेक भागांना थोडा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. तसेच, मोसमी पावसाचा मार्ग मोकळा होण्यासही ही प्रणाली कारणीभूत ठरू शकते, असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
कमी दाबाचा पट्टा म्हणजे हवामानातील एक अशी स्थिती असते जिथे वातावरणाचा दाब आजूबाजूच्या भागांपेक्षा कमी असतो. पृथ्वीवरील हवा गरम झाली की ती हलकी होते आणि वर जाते. अशा वेळी त्या भागात हवेची कमतरता निर्माण होते. ज्याला कमी दाबाचे क्षेत्र’ किंवा ‘कमी दाबाचा पट्टा म्हणतात. ही रिकामी जागा भरून काढण्यासाठी आजूबाजूच्या भागांतील थंड व दमट हवा त्या दिशेने वाहू लागते. यामुळे ढग तयार होतात आणि पाऊस पडण्याची शक्यता वाढते. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला, तर तो महाराष्ट्र, ओडिशा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल अशा किनारपट्टीच्या भागांमध्ये पावसाचं प्रमाण वाढविण्यास कारणीभूत ठरतो.

  • सतर्कतेचा इशारा (यलो अलर्ट ) रत्नागिरी, सिंधुदुर्ग.
  • विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज तर पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली सोलापूर, बीड, नांदेड, लातूर आणि धाराशिव.

मागील ११ दिवसांपासून नैऋत्य मोसमी वाऱ्यांनी वाटचाल केलेली नाही. मोसमी वाऱ्यांची सीमा रविवारीही अदिलाबाद, पूरी आणि पूर्व भारतातील बालूरघाट पर्यंत मोसमी वान्यांची सीमा रविवारीही कायम होती. मोसमी वारे अजूनही कमजोर असल्याने मोसमी पावसाच्या पुढील वाटचालीस वाट पहावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!