पितृपक्षात कावळे कमी असल्याने पितरांच्या नैवेद्यासाठी तारांबळ ; पक्ष्यांचे महत्त्व कळण्यासाठी शहरात जनजागृतीची आवश्यकता

मुंबई: गेल्या काही वर्षांपासून गावखेड्यापासून शहरापर्यंत सगळीकडे शहरीकरण वाढल्याने पक्षांची संख्या कमी झाली आहे. त्यात कावळ्यांचीही संख्या कमी होत चालली आहे. वृक्ष तोडून विकासाच्या नावाखाली बिल्डर सिमेंट काँक्रिट चे जंगल वाढवत इमारती बांधत आहे. त्यामुळे पितृपक्षात कावळ्यासाठी नैवेद्य अर्पण करणे कठीण झाले आहे. त्यामुळे पक्ष्यांचे महत्त्व कळण्यासाठी शहरात जनजागृतीची आवश्यकता आहे.
दरवर्षी पितृपक्षात कावळ्याला श्राद्धाचे अन्न भरवण्याची प्रथा आहे. पूर्वजांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी कावळ्याला भोजन दिले जाते. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत वाढत्या शहरीकरणामुळे झाडे तोडली जात आहेत आणि पक्ष्यांचे अधिवास नष्ट होत चालले आहेत, त्यामुळे कावळ्यांची संख्या लक्षणीयरीत्या कमी झाली आहे.
कावळ्यांची संख्या कमी होणे ही पर्यावरणाबाबतची गंभीर समस्या आहे. यामुळे पक्ष्यांचे महत्त्व आणि पर्यावरणाचे संवर्धन किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा समोर आले आहे. या प्रथेमुळे लोकांमध्ये पर्यावरणाप्रती जागरूकता वाढवणे किती गरजेचे आहे याची प्रचिती या पितृपक्षात येत आहे.
काही लोक आता कावळ्यांच्या तुलनेत इतर पक्षी जसे की कबुतरे, चिमण्यांना अन्न देऊन पितरांचे स्मरण करत आहेत. या पार्श्वभूमीवर पक्ष्यांच्या अधिवासाचे महत्त्व किती आहे हे समजण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याची आवश्यकता आहे.