राष्ट्रीय सेवा योजनेसाठी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची तरतूद – राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू यांच्या पाठपुराव्याला यश

मुंबई : राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय सेवा योजनेसाठी 7 कोटी रुपयांची तरतूद केली असून यामुळे राज्यातील सुमारे साडे तीन लाख विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी राष्ट्रीय सेवा योजनेसाठी वाढीव निधीची मागणी केली होती. राज्याच्या अर्थसंकल्पात राष्ट्रीय सेवा योजनेसाठी ७ कोटी रुपये वाढीव तरतूद झाली असल्याची माहिती, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य सल्लागार समिती सदस्य अंकित प्रभू यांनी दिली.
प्रभू पुढे म्हणाले की, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी केंद्र सरकारडे राष्ट्रीय सेवा योजनेसाठी निधीची मागणी केली होती. मंत्री श्री सामंत यांच्या मागणीचा विचार करून केंद्र सरकारनेही राष्ट्रीय सेवा योजनेसाठीच्या निधीतही वाढ केली. ही बाब उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांच्या लक्षात आणून दिली. तसेच आपणही निधी वाढवून देण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. त्यावेळी कोणताही विलंब न करता उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी अर्थसंकल्पात 7 कोटी रुपयांची वाढीव तरतूद केली. श्री सामंत यांनी केंद्र तसेच राज्य सरकारकडूनही राष्ट्रीय सेवा योजनेसाठी निधी उपलब्ध करून दिला. त्यामुळे आम्ही मंत्री महोदय श्री सामंत यांचे आभारी आहोत, असे श्री प्रभू यांनी सांगितले.
राज्य आणि केंद्र सरकारने राष्ट्रीय सेवा योजनेच्या अनुदानात भरीव वाढ केल्यामुळे विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे. राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांना पूर्वी नियमित कार्यक्रमासाठी 250 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 400 रुपये मिळणार आहेत. तर विशेष कार्यक्रमासाठी पूर्वी 450 रुपये मिळत होते, त्यात वाढ होऊन 700 रुपये मिळणार आहेत, अशी माहिती श्री अंकित प्रभू यांनी दिली. तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री उदय सामंत यांनी निधी उपलब्ध करून दिल्या बद्दल अंकित प्रभु यांनी मंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन आभार व्यक्त केले.