ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सामाजिक कार्यकर्ते विजय वैद्य यांच्या प्रथम स्मृतिदिनानिमित्त विशेष लेख ! असे जगावे…………!

करून जावे असेही काही दुनियेतून या जातांना
गहिवर यावा जगास साऱ्या निरोप शेवट देतांना
स्वर कठोर त्या काळाचाही व्हावा कातर कातर
नजर रोखूनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर…
मुंबई ; सुप्रसिद्ध कवी गुरु ठाकूर यांच्या ‘असे जगावे ‘ या कवितेतील ओळी म्हणजे एखाद्या व्यक्तीचे जीवन असू शकते ही कल्पना नसून वस्तुस्थिती आहे. ज्येष्ठ पत्रकार, राजकीय विश्लेषक आणि सन्माननीय राज्यपालांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला ते विजय दत्तात्रय वैद्य.वरील कवितेतील ओळी अक्षरशः जगले.
जव्हार सारख्या एका छोट्याशा गावात त्यांचा जन्म झाला.
सर्वसामान्य मुलांप्रमाणे गावाहून शहरात एखाद्या कार्यालयात कारकुनाची नोकरी करून आयुष्य घालवावे असे स्वप्न त्यांना कधीच पडले नव्हते. किंबहुना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत स्वतः चे जीवन सावरून जव्हार येथील संस्थानाच्या आमदारपद भूषविणाऱ्या एका धाडसी आईच्या पोटी जन्म घेतलेले विजय वैद्य हे एका निश्चित ध्येयासाठी भूतलावर आले असावेत.
त्यांना आयुष्यात जे काही प्राप्त झाले त्याकरिता त्यांना फार काही मोठे असे पाठबळ नव्हते, आई जरी एक महत्त्वाचे पद भूषवित होती तरी त्याकरिता फार काही मोठ्या सोयी सुविधा मिळत नव्हत्या. त्या काळामध्ये एखादे पद भूषविणे याचे प्रयोजन फक्त आणि फक्त समाजकार्य हेच असे. मुंबईला आल्यावर रात्र शाळेत नोकरी करून तर कधी ग्रंथालयामध्ये, पुढे टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राच्या कार्यालयात काही काळ नोकरी केली. परंतु विधात्याने मात्र विजय वैद्य यांच्या साठी वेगळेच भविष्य वर्तवले होते. सतत पुस्तकांच्या, लेखकांच्या, मान्यवरांच्या आणि वृत्तपत्राच्या संगतीत राहिल्याने पत्रकार होणे हे जणू विधिलिखित झाले. हा प्रवास सोपा नव्हता. त्या काळामध्ये पत्रकारांना अगदी कमी मानधनावर देखील काम करावे लागे. त्यासाठी बरीच मेहनत पायपीट देखी करावी लागे. परंतु हे सर्व श्री विजय वैद्य यांनी अत्यंत आनंदाने स्वीकारले होते. बरे इतक्यावरच न थांबता त्यांनी स्वतःलाच चाचपून पाहिले की मला अजून वेगळे काय करता येईल. ज्याप्रमाणे मागणी त्याप्रमाणे पुरवठा व्हावा आणि त्यांना विविध वाटा दिसू लागल्या. बेपत्ता मुलांचा शोध घेणारी संस्था स्थापन करून त्याची मुहूर्तमेढ रोवली. एका बाजूला वर्तमानपत्रांमध्ये विविध टोपण नावे धारण करून स्तंभलेखन सुरूच होते. देव या पृथ्वीतलावर माणसाला कोणते भांडवल देऊन पाठवतो ? सर्वात मोठे भांडवल म्हणजे शरीर आणि बुद्धी. आपल्या हातून जीवन नीट घडवता आले नाही तर लोक देवाला दोष देतात. परंतु वैद्य काका मात्र जे काही देवाकडून लाभले त्याला अनमोल भांडवल समजून त्याचा पुरेपूर उपयोग करत राहिले. त्यांच्या या स्वभावामुळे प्रबोधनकार ठाकरे यांचा सहवास त्यांना लाभला. असे कितीतरी मान्यवर अगदी सहजपणे त्यांच्या संपर्कात आले. पुढे याचा फायदा मात्र त्यांनी स्थानिक विभागात वसंत व्याख्यानमाला हा उपक्रम राबवून सर्वांना करून दिला. चार दशकाहून अधिक काळ जय महाराष्ट्र नगर या वसंत व्याख्यानमालेमध्ये अनेक मान्यवर मंत्री, लोकप्रतिनिधी,कलावंत, लेखक,गायक, क्रीडापटू, महत्त्वाचे अधिकारी यांचे केवळ दर्शन नव्हे तर त्यांच्या विचारांचे मार्गदर्शन सर्वसामान्यांना उपलब्ध करून दिले. प्रसिद्ध कलाकारांच्या गीतमैफली अगदी सहजपणे स्थानिकांना अनुभवता आल्या. जीवनात उत्तुंग कार्य केलेल्या व्यक्ती कशा वागतात, बोलतात तसेच त्यांच्याशी विनायशील पणे कसे बोलावे याचे प्रत्यक्ष दर्शन घडवून परिसरातील लहान थोरांना नकळतपणे त्याचे संस्कार दिले. ज्या हेतूने मुंबईत लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव सुरु केला होता त्याच हेतूने प्रेरित होऊन ‘उपनगरचा राजा ‘ उपनगरात सुरू केला. त्याकरिता विभागातील तरुण मंडळींना हाताशी धरून एक मोठे कार्य संपन्न केले. इतकेच नव्हे तर कोकणातील संस्कृतीची ओळख, खाद्य भ्रमंतीची सफर घडवून आणण्यासाठी मालवणी जत्रा हा उपक्रम देखील राबविला. एखाद्या पत्रकाराने इतके विविध अंगी कार्य करावे यातूनच आपल्या सर्वांना खरे तर खूप काही शिकण्यासारखे आहे.
वैद्यकाकांकडे माहितीचा इतका साठा असायचा की एखादी घटना,कोणत्या वर्षी,कोणत्या तारखेला कुठे घडली. याचा संपूर्ण वृत्तांत संदर्भ ते सहज सांगू शकत. त्यामुळेच कितीतरी महत्त्वाच्या व्यक्तींचा व्यासंग त्यांना सातत्याने लाभत असे. परंतु असा सहवास मिळविण्यासाठी देखील साधना करावी लागते. वैद्यकाका स्वतः पत्रकारितेतील एक विद्यापीठ होते असे म्हणणे जास्त संयुक्तिक ठरेल. वैद्यकाकांचे छोटेखानी घर नेहमीच विविध वृत्तपत्रांनी भरलेले असायचे. रोजच्या गरजेपुरतेच सामान घरात ठेवून जास्तीत जास्त जागा मात्र वृत्तपत्रांनी व्यापलेली असायची. एरव्ही एका वृत्तपत्राने छापलेली बातमी इतर वृत्तपत्रे छापण्यास फारशी उत्सुकता दाखवत नाहीत परंतु वैद्य काका मात्र विविध वृत्तपत्रातून अनेक प्रकारचे लेख आवर्जून वाचत. इतकेच नव्हे तर एखादी महत्त्वाची व्यक्ती विशेष लेख यांचे कात्रणे ते कागदावर चिकटवून त्याखाली दिनांक वृत्तपत्राचे नाव आवर्जून लिहीत. असे विविध मान्यवरांचे लेख संग्रहित करून अनेक खंड त्यांनी बनविले होते. सर्वसामान्यपणे लोक स्वतःच्या मुलांच्या वह्या पुस्तकांना कव्हर घालण्यास देखील अनुत्सुक असतात. परंतु वैद्य काका मोठ मोठे खंड बनविण्याकरता स्वतः कात्रणे कापून ती चिकटवून पुढे झेरॉक्स काढण्यासाठी स्वतःच पायपीट करत. एखादे काम तेच तेच करीत राहिले की काही काळानंतर त्याचा कंटाळा येऊ शकतो परंतु वैद्य काका मात्र आवडीने हा छंद जोपासत. स्वतःच्या छंद मधून स्वतःबरोबर इतरांना फक्त आनंदच नव्हे तर त्याचा उपयोग देखील करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांच्या हातून घडत राहिले.
वृद्धापकाळाने थोडी खंगलेली, निराश झालेली काही माणसे आपण पाहतो. परंतु वयाच्या 82 व्या वर्षी देखील उत्साहाने कार्य करणारे वैद्यकाका मात्र नेहमीच प्रेरणादायी वाटत. त्यांना सतत लोकांना भेटावेसे वाटे. स्वतःच्या आयुष्यात वेचलेले सुंदर क्षण, आठवणी इतरांना वाटताना,सांगताना त्यांच्या चेहऱ्यावर अपार आनंद दिसत असे. वयोमानापरत्वे छोट्या मोठया आधी व्याधी असल्या तरी ते अगदी लिलया त्यातून बाहेर येत. या उलट एखाद्या वेळी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यास गेले असता ते बेडवरच टुणकन उडी मारून चक्क गप्पा मारत. आणि गप्पांचा विषय अर्थातच आयुष्यात भेटलेली मान्यवर माणसे, त्यांच्यासोबत घालवलेले अनमोल क्षण हेच असे.
‘ जे जे आपणांसी ठावे ते ते दुसऱ्याशी सांगावे
शहाणे करुनी सोडावे सकल जन ‘ या प्रसिद्ध उक्तीप्रमाणे
त्यांचा जीवन होते. त्यामुळेच राज्यपालांच्या हस्ते फक्त एकदाच नव्हे तर दोनदा जीवनगौरव पुरस्कार आणि त्या व्यतिरिक्त अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले होते.
कोरोना काळात देखील त्यांचे कार्य अव्याहतपणे सुरूच होते. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते हाती घेतलेले कार्य अविरतपणे करत राहिले म्हणूनच त्यांनी या जगातून निरोप घेताना काळाच्या समोर देखील कातर झाला. वैद्यकाकांनी मात्र सर्वांना स्वतःच्या जगण्यातून एकच संदेश दिला.
असे जगावे छाताडावर आव्हानांचे लावून अत्तर
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर……
-प्रा. नयना रेगे, [email protected]/9820451579 (लेखिका या महाविद्यालयात व्याख्यात्या आहेत.)