महाराष्ट्र

काही कीर्तनकारांना नथुराम गोडसे आदर्श वाटतो हा किर्तन परंपरेवर कलंक..

अंबाजोगाई: देशातील पहिला दहशतवादी, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हत्यारा मथुराम गोडसे काही कीर्तनकारांना आदर्श वाटतो, नथुराम गोडसे सारखे व्हावे वाटते, हा कीर्तन परंपरेवरील कलंक आहे, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांनी अशाप्रसंगी मौन बाळगणं ही अशा प्रवृत्तींना मूक संमती ठरेल, असा घनाघात ह. भ. प. शामसुंदर महाराज सोन्नर यांनी अंबाजोगाई येथे केला. वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संदीपान महाराज शिंदे यांच्या सत्कार प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पावनधाम संस्थानचे प्रमुख ह. भ. प. महादेव महाराज बोराडे यांच्यासह हजारो वारकरी यावेळी उपस्थित होते.

अंबाजोगाई येथील नारायण दादा काळदाते प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा नारायण दादा काळदाते स्मृति पुरस्कार यावर्षी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ज्ञानसिंधू संदिपान महाराज शिंदे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. डॉ फुलारी यांनी वारकरी संप्रदायाच्या उच्चतत्त्वज्ञानाचा आढावा घेत वारकरी हा एकमेव संप्रदाय हा आहे, जो माणूस जोडण्याचे काम करत आहे. वारकरी संतांनी मांडलेले विचार, पुढील हजारो पिढ्यांना मार्गदर्शक ठरणारे आहेत. अशा संप्रदायाच्या कीर्तनकाराचा माझ्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान होत आहे, ही माझ्यासाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. कारण माझ्या घरातही वारकरी परंपरा आहे या परंपरेचा मी पाईक आहे. संदीप महाराज शिंदे हासेगावकर यांच्याकडून अशीच वारकरी संप्रदायाची सेवा घडावी आशा सदिच्छा डॉ. फुलारी यांनी दिल्या.

सत्कारला उत्तर देताना संदिपान महाराज शिंदे यांनी जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष झाल्यापासून तेथे करण्यात आलेल्या सुधारणा, विविध ठिकाणी सुरू असलेले संस्थेचे कार्य, सुरू होत असलेल्या उपशाखा यांची माहिती दिली . जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून हजारो कीर्तनकार घडवण्याचे काम केले जात आहे, भविष्यात ते अधिक जोमाने केले जाईल, असे सांगितले.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, ह. भ. प. गुरुवर्य संदिपान महाराज शिंदे यांचे वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पुण्य पावन आळंदी भूमीत हजारो कीर्तनकार घडवणाऱ्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आहेत. या संस्थेतून आतापर्यंत हजारो कीर्तनकार होऊन गेले आहेत. या शिक्षण संस्थेला कालसुसंगत, आधुनिक करण्यात संदिपान महाराज शिंदे हसेगावकर यांचे मोलाचे योगदान आहे. जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे संस्थापक विष्णुपंत महाराज जोग यांचा शकलोतर स्मृती समारोह आणि जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचा शतक महोत्सवी वर्धापनदिन देश पातळीवर चर्चा होईल इतक्या भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात आला यात संदिपान महाराज शिंदे यांचे मोठे योगदान आहे. वारकरी संप्रदायातील अशा उतुंग व्यक्तिमत्त्वाला नारायण दादा काळदाते यांच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार देऊन सन्मान होत आहे, ही अत्यंत महत्त्वाची घटना आहे. नारायण दादा यांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वारकरी संप्रदायाचा सत्यविचार आयुष्यभर जपला, असे शामसुंदर महाराज म्हणाले.

संदिपान महाराज शिंदे यांच्या कार्याचा आढावा घेऊन शामसुंदर महाराज पुढे म्हणाले की, वारकरी संप्रदाय आणि एकंदरच समाज आज अत्यंत वाईट कालखंडातून जात आहे. जात धर्म यावरून माणूस माणसापासून तोडला जात आहे. वारकरी संप्रदायाबद्दल बोलायचे झाले तर संतांनी आम्हाला समतेचा, स्वातंत्र्याचा, बंधुत्वाचा विचार दिला. मात्र आज कीर्तनकार जात आणि धर्मावरून माणसं तोडण्याचे काम करत आहेत. ज्या महात्मा गांधींनी तुकाराम महाराजांच्या अभंगाचे इंग्रजीत भाषांतर करून ते अभंग केवळ देशातीलच नव्हे तर प्रदेशातील लोकांना समजावे, असे काम केले. त्या वारकरी संत विचार प्रसारक महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम गोडसे हा काही कीर्तनकारांना आदर्श वाटत असेल तर हा कीर्तनपरंपरेवरील कलंक आहे, तो पुसून काढण्यासाठी वारकरी संप्रदायातील ज्येष्ठांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही यावेळी शामसुंदर महाराज सोन्नर यांनी केले.
कार्यक्रमाची प्रास्ताविक करताना संस्थेचे सचिव डॉ नरेंद्र काळे यांनी नारायण दादा प्रतिष्ठानच्या कार्याचा आढावा घेतला. शैक्षणिक क्षेत्रात नारायण दादांनी उभे केलेले कार्य आजही तितक्याच जोमाने सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्याचाच भाग म्हणून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते याचाही त्यांनी उल्लेख केला. मानव लोकचे अनिकेत लोहिया हे ही या वेळी उपस्थित होते.
संविधान प्रचारक
संविधान संस्कार अभियान, औरंगाबाद महा. 18
वारकरी मंच महाराष्ट्र राज्य
ज्ञानामृत वारकरी शिक्षण संस्था
वारकरी ग्राफिक्स डिझाईनर
कल्याण कल्याणकर आळंदी
माऊली सेवा संस्था आळंदी (देवाची)
वारकरी संप्रदाय

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!