संविधान विरोधी जनसुरक्षा कायदा २०२४ रद्द करा.. जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीकडून राज्यभर निषेध आंदोलन.

मुंबई; शहरी नक्षलवादाचा बिमोड करण्याच्या गोंडस नावाखाली राज्यातील महायुती सरकारने आणलेला जनसुरक्षा कायदा हा जनसामान्यांचा आवाज दाबणारा, घटनाविरोधी कायदा आहे. या अत्याचारी जनसुरक्षा कायद्याविरोधात इंडिया आघाडीने आज राज्यभर निषेध आंदोलन करून हा अन्यायकारक कायदा रद्द करा,अशी मागणी केली. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), माकपा, भाकपा, शेकाप यांच्यासह समविचारी पक्षांनी व सामाजिक संघटनांनी या आंदोलात भाग घेतला.
मुंबईत शिवाजी पार्क येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडी व डाव्या पक्षांच्या वतीने आंदोलन करण्यात आले, यावेळी आमदार डॉ. ज्योती गायकवाड, कम्युनिस्ट नेते प्रकाश रेड्डी, प्रदेश उपाध्यक्ष राजन भोसले, राजेश शर्मा, धनंजय शिंदे यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर येथे आंदोलन करण्यात आले. नागपुर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे व्हेरायंटी चौक येथील गांधी पुतळ्याजवळ अध्यक्ष आ. विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनात प्रदेश उपाध्यक्ष आ. अभिजीत वंजारी, विशाल मुत्तेमवार यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या निषेध आंदोलनात खासदार कल्याण काळे, जिल्हाध्यक्ष किरण पाटील, शहर जिल्हा कमिटीचे अध्यक्ष शेख युसूफ यांच्यासह इंडिया आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते. बुलढाणा, जालना, अमरावती, नांदेड, चंद्रपूर, पालघर, रत्नागिरी, धाराशिव, सोलापूर, लातूर, ठाणे, जळगाव, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे यासह राज्यभरातील सर्व जिल्हाच्या ठिकाणी आणि तालुका मुख्यालयी महाविकास आघाडीच्या सर्व मित्र पक्षांचे नेते पदाधिकारी व कार्यकर्ते, डावे पक्ष व सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींनी एकत्र येऊन या काळ्या कायद्याविरोधात आंदोलन केले.