घाम फोडणाऱ्या उकाड्यानंतर राज्यात पुन्हा पावसाचं पुनरागमन ? कोकणापासून विदर्भापर्यंत इशारा..

मुंबई: केंद्रीय हवामान विभागानं देशातील उत्तरेकडे असणाऱ्या राज्यांना पावसाचा इशारा दिलेला असतानाच इथं महाराष्ट्रात तर पावसाचा किंबहुना हवामानाचा काही नेम लागत नाहीये. दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तासांमध्ये ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारे वाहणार असून काही दुर्गम भागांसह इतरही भागांमध्ये पावसाची हजेरी असेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकणात मात्र पावसाळी ढग चकवा देताना दिसतील आणि उन्हासोत त्यांचा लपंडाव सुरू असेल अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळू शकते. पावसाची मधूनच येणारी एखागी जोरदार सर वगळता कोकणातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पाऊस रजेवर गेल्याचं पाहायला मिळेल.
मुंबई शहर आणि उपनगरांमध्येही कमाल तापमानात वाढ होणार असून, आकाश अंशतः ढगाळ राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शहर आणि उपनगराच्या काही क्षेत्रांमध्ये पावसाच्या तुरळक सरींचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. ठाणे आणि पालघरमध्येही पावसाचा जोर कमी झालेला असेल. मात्र तूर्तास राज्याच्या मराठवाडा भागामध्ये पावसाचा जोर तुलनेनं वाढला असल्यानं हवामान विभागानं या भागासाठी सतर्कतेचा इशारा जारी केला आहे.