‘साहित्य रंग’ भाग – २३, प्रेक्षकांच्या भेटीला…विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या संकल्पनेवर एक दर्जेदार साहित्यिक पर्व

मुंबई, : मिती ग्रुप प्रस्तुत आणि महाराष्ट्र विधान परिषदेच्या मा. उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विशेष पुढाकारातून साहित्य, कविता आणि विचारांची मेजवानी देणारे ‘साहित्य रंग’ या डिजीटल व्यासपीठाचा २३ वा भाग १२ सप्टेंबर २०२५ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सायंकाळी ७ वाजता हा कार्यक्रम मिती ग्रुप डिजिटलच्या युट्यूब चॅनेलवर प्रसारित होणार आहे.
साहित्यप्रेमींसाठी ही मोठी आनंदाची बातमी आहे. या भागात लेखक, डॉ. संदीप श्रोत्री व कवी अमोल अहेर आपले लेख, साहित्यिक विचार, कविता आणि रचना सादर करणार आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तरा मोने या करणार असून, नेहमीप्रमाणे रसिकांशी संवाद साधणारी ही मालिका साहित्यप्रेमींसाठी एक पर्वणी ठरणार आहे.
लेखक, डॉ. संदीप श्रोत्री हे साताऱ्यातील प्रसिद्ध शल्यविशारद व पर्यावरण कार्यकर्ते असून हिमालयीन ट्रेकिंग मोहिमा, गड-किल्ल्यांवरील भटकंती, पक्षीनिरीक्षण आणि पर्यावरण संवर्धन यात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. ‘एव्हरेस्टच्या पायथ्याशी’, ‘पुष्पपठार कास’, ‘कासवांचे बेट’, ‘मनूचे अरण्य’ यांसह अनेक प्रवासवर्णनात्मक पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. वसुंधरा पर्यावरण पुरस्कार, किर्लोस्कर वसुंधरा सन्मान, यशवंतराव चव्हाण वाङ्मय पुरस्कार आदी अनेक सन्मानांनी त्यांचा गौरव झाला आहे.
कवी अमोल अहेर हे जालना जिल्ह्यातील मूळ रहिवासी व सध्या पुण्यात राज्यकर अधिकारी (GST ऑफिसर) म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी ‘मुक्काम पोस्ट: माणूस’, ‘हे कवडसे माणसांचे’, ‘अंतरीचा कॅनव्हास’ असे काव्य व कथासंग्रह प्रकाशित केले आहेत. त्यांच्या साहित्याला कविवर्य नारायण सुर्वे पुरस्कार, काव्य प्रतिभा पुरस्कार, तसेच विविध साहित्य संस्थांचे मानाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
‘साहित्य रंग’ ही मालिका डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या साहित्यिक जाणिवेचा आणि नव्या लेखक-कवींसाठी उभारलेल्या व्यासपीठाचा उत्तम नमुना आहे.
रसिक प्रेक्षकांना हा कार्यक्रम खालील लिंकवर पाहता येईल –
लिंक :
https://www.youtube.com/@mitigroupdigital8928