महाराष्ट्र

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र सर्वोत्तम राज्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, :  महाराष्ट्र हे देशातील एक उद्योगस्नेही राज्य असून उद्योग आणि गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम आहे. ‘इज ऑफ ड्युईंग बिझनेस’अंतर्गत राज्यात गुंतवणूक आणि उद्योगांसाठी पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

जियो वर्ल्ड ट्रेड सेंटर येथे इंडिया-ऑस्ट्रेलिया बिझनेस अँड कम्युनिटी अलायन्स (आयएबीसीए) ग्लोबल फोरम लिडर्स मीट आणि सीईओंसोबत राऊंटटेबल कॉन्फरन्स वेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी तत्पर असल्याचे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्य शासन विविध क्षेत्रांविषयी नवीन धोरण आखत आहे. येत्या काळात १४ क्षेत्रांसाठीची धोरणे जाहीर होणार आहेत. त्यामध्ये सेवा क्षेत्राचा समावेश आहे. राज्याच्या आर्थिक प्रगतीमध्ये सेवा क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योजकांना गुंतवणूकदारांना अडचणी येऊ नयेत सर्व परवानग्या लवकर प्राप्त करता याव्यात या साठी मैत्री पोर्टल निर्माण करण्यात आले आहे. एक खिडकी योजना असून उद्योजकांना राज्यात गुंतवणूक करताना चांगला अनुभव यावा यासाठी प्रयत्नशील असल्याचेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, इज ऑफ ड्युईंग बिझनेस मध्ये नव्याने सुधारणा करण्यात येत आहेत. गुंतवणुकीच्या नवीन संकल्पना राबवण्यात येत आहेत. राज्यात एक्सप्रेस वे चे जाळे उभारले जात आहे. वाढवण बंदरामुळे राज्य सागरी व्यापार क्षेत्रात महत्वाचा भागीदार असणार आहे. संपूर्ण राज्यातील महत्त्वाची ठिकाणे सहा तासाच्या अंतराने वाढवण बंदराशी जोडली जात आहेत. राज्यात सांडपाणी व्यवस्थापन, त्यावरील प्रक्रिया, सौर ऊर्जा, पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या मोठ्या संधी आहेत. त्याचा ऑस्ट्रेलियातील उद्योगांनी फायदा घ्यावा. या क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी पुढाकार घ्यावा. पुणे येथे नवीन विमानतळ उभारण्यात येत आहे. त्यामुळे पुणे शहराच्या विकासाला आणखी गती मिळेल. पुण्यात जलद वाहतुकीसाठी पायाभूत सुविधांचे नवनवीन प्रकल्प उभारण्यात येत आहेत. शासन उद्योग आणि गुंतवणूकदारांसाठी सकारात्मक निर्णय घेत असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या राऊंड टेबल कॉन्फरन्सपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी निमंत्रित व उद्योगांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ऑस्ट्रेलिया हा शिक्षण क्षेत्रातील एक अग्रगण्य देश आहे. अनेक भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षणासाठी जातात. आता हेच शिक्षण नवी मुंबई येथील ‘एज्यूसिटी’ मध्ये मिळणार आहे. तसेच गोंडवाना विद्यापीठाशी कुर्निल विद्यापीठाने केलेल्या करारामुळे खाणकाम क्षेत्रातील तंत्रज्ञानाचे शिक्षण उपलब्ध होऊन त्याचा फायदा गडचिरोली जिल्ह्यातील लोह उद्योगाला होईल. गडचिरोली ही देशाची लोह राजधानी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी पणन मंत्री जयकुमार रावल, ऑस्ट्रेलियाचे उच्चायुक्त फिलीप ग्रीन, उद्योग विभागाचे सचिव पी. अन्बलगन यांच्यासह विविध उद्योगांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!