भाजपाने देव आणि दैवत व महापुरुषांचा बाजार मांडला, स्वाभिमान, संस्कृती व अस्मितांशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ – सचिन सावंत

मुंबई; भारतीय जनता पक्ष व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने गेली अनेक वर्ष धर्माचा, राष्ट्रीय अस्मितांचा व भोंगळ राष्ट्रवादाचा आपल्या सत्तेच्या राजकारणासाठी गैरवापर केला आहे. यांचे हिंदुत्व हे इतर धर्मियांचा द्वेष करणारे करणारे असून या तिरस्काराच्या तव्यावर सत्तेच्या भाकऱ्या थापल्या जात आहेत. भाजपाने आपल्या देवांचा व दैवतांचा बाजार मांडून अस्मितेशी खेळत कार्पोरेट हिंदुत्वाचा खेळ सुरु केला आहे, असा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
गांधी भवन येथे पत्रकार परिषदेत बोलताना सचिन सावंत म्हणाले की, भाजपाचे हिंदुत्व आता कार्पोरेट झाले असून पैशासाठी त्यांनी आपले देव, आराध्य दैवत व ज्यांनी देशासाठी मोठे योगदान दिले आहे त्यांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसचे आता कोटक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस केले आहे. सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनचे आता आयसीआयसीआय लोम्बार्ड, महालक्ष्मीचे एचडीएफसी लाईफ तर आचार्य अत्रे स्टेशनचे निप्पॉन एमएफ असे नामकरण केले आहे. आपल्या अस्मितांशी चालवलेला हा खेळ संताप आणणारा आहे. भारतीय जनता पक्ष, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी यावर खुलासा करावा. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना महाराजांच्या नावासमोर कोटक लावलेले चालते का, असा प्रश्न विचारून काँग्रेस पक्ष व महाराष्ट्रातील जनता हा अपमान कदापी सहन करणार नाही, असा इशारा सचिन सावंत यांनी दिला आहे.
शेतकरी, मजूर, कामगार, महिला, बेरोजगारीचे प्रश्न असताना त्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपा नामकरणाच्या नावाखाली अस्मितेचे राजकारण करत आहे. इलाहाबादचे प्रयागराज, फैजाबादचे अयोध्या, दिल्लीतील राजपथचे कर्तव्यपथ, रेसकोर्स रोडचे लोक कल्याण मार्ग नामकरण केले परंतु देशाचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरु, गांधी यांच्या नावाची भाजपाला ऍलर्जी असल्याने सायन्स सेंटरच्या नावातून नेहरु व नॅशनल पार्क स्टेशनच्या नावातून संजय गांधी यांचे नाव मात्र वगळले आहे. ही नावे आपला सार्वजनिक वारसा आहे आणि तोच भाजपाने विकायला काढला आहे. आपल्या अभिमानाचा, स्वाभिमानाचा, श्रद्धेचा व इतिहासाचा व्यापार चालवला आहे. आता काळबादेवी व शितलादेवी स्टेशन बाकी आहेत त्यासाठीही कार्पोरेट कंपन्यांसमोर हे सरकार हात पसरून त्यांच्या नावासाठीही लिलाव करतील. देशातील विमानतळे, बंदरे, सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या, सरकारी जागा कार्पोरेट्सना विकत आहेत. कार्पोरेटच्या हितासमोर भाजपाने धर्म, अस्मिता व संस्कृतीवर पाणी सोडले आहे. सनातन धर्माच्या नावाने शंख फुंकणारे देवस्थानांची नावे विकत आहेत यातून भाजपाचे दांभिक हिंदुत्व दिसून येते. सत्तेसाठी अस्मितेचे राजकारण करणारा भाजपा सत्तेत आल्यानंतर मात्र तीच अस्मिता कार्पोरेट्सच्या पायी वाहतो, असेही सावंत म्हणाले.