कोकण रेल्वे प्रवाशांच्या समस्येकडे दुर्लक्ष, दाद मागण्यांसाठी दादर येथे उपोषण

मुंबई : कोकण रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक असलेल्या गाड्यांच्या मागण्या सरकार दरबारी वारंवार केल्या जात असूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत जल फाऊंडेशन कोकण विभागतर्फे येत्या गुरुवार दि. २ ऑक्टोबर २०२५ रोजी मुंबईतील दादर सेंट्रल रेल्वे स्थानक, टर्मिनल पूर्व येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या उपोषणाद्वारे रत्नागिरी-दादर गाडी पूर्ववत करावी व मुंबई/दादर ते चिपळूण दरम्यान नवी गाडी सुरू करावी अशा दोन महत्त्वाच्या मागण्या पुढे रेटल्या जाणार आहेत.
या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संस्थेकडून सांगण्यात आले की, कोकणवासीय प्रवासासाठी मुंबई-कोकण दरम्यान गाड्यांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत. मात्र, उपलब्ध गाड्यांची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांना प्रचंड गर्दीचा सामना करावा लागतो. उभ्याने, शौचालयाजवळ किंवा गर्दीतून प्रवास करावा लागतो, ही परिस्थिती अमानवी आहे. आपण गावी जाताना जशी गर्दीष करतो तशीच गर्दी आंदोलनात केली, तरच शासन-प्रशासनाला दखल घ्यावी लागेल, असे आवाहन आयोजकांनी केले.