महाराष्ट्रमुंबई
अखेर नवाब मलिक अजित पवार गटात

मुंबई: अनेक महिने बाजूला ठेवल्यानंतर अजित पवार गटाचे माजी आमदार नवाब मलिक यांचे राजकीय पुनरागमन झाले आहे. बुधवारी झालेल्या पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत मलिक यांची नियुक्ती मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी पक्षाच्या निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख म्हणून करण्यात आली आहे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मुंबईतील पक्षाची निवडणूक रणनीती ठरविण्याची जबाबदारी नवाब मलिक यांच्यावर असेल. त्यात लढविल्या जाणाऱ्या जागा, उमेदवार आणि पक्षातील एकूण समन्वय यांचा समावेश असल्याचे बैठकीनंतर एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. निवडणूक व्यवस्थापन समितीचे प्रमुख असल्याने, महायुतीने एकत्र निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला तर मलिक महायुतीच्या मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिंदेसेनेसोबत जागा वाटपावर चर्चा करण्याची शक्यता आहे.