कला दालन हे पश्चिम उपनगरातील कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ ; नितीन नायक यांनी काढले प्रशंसोद्गार

मुंबई, दि. (प्रतिनिधी) : गोरेगांव येथे सुरु करण्यात आलेले कला दालन (आर्ट गॅलरी) म्हणजे पश्चिम उपनगरातील कलाकारांसाठी उत्तम व्यासपीठ असल्याचे प्रशंसोद्गार नितीन नायक यांनी काढले. यंदाच्या सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर ‘गणेश २०२५’ या कला प्रदर्शनाचे उद्घाटन क्रिएटिव्ह कॉन्सेप्ट आणि इव्हेंट डिस्प्लेचे नितीन नायक आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गोरेगाव विधानसभा विभाग अध्यक्ष विरेंद्र जाधव यांच्या हस्ते झाले. विशेष अतिथी म्हणून मनसेच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा श्रीमती सुनीता चुरी या उपस्थित होत्या. उद्घाटन सोहळ्याचे नियोजन श्रीमती प्रणिता पाटील व श्रीमती पूर्णिमा फलटणकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शकील पाठारे यांनी केले. कृष्णकांत झुनझुनवाला यांनी कला दालना (गॅलरी) बद्दल माहिती दिली. श्री नितीन नायक यांनी आपल्या भाषणात गॅलरीच्या उपक्रमाचे कौतुक केले. बोरीवली ते वांद्रे परिसरातील कलाकारांसाठी ही गॅलरी म्हणजे एक उत्तम व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. तसेच या गॅलरीमुळे अनेक प्रस्थापित व उदयोन्मुख कलाकारांना स्वतःच्या कलेला प्रदर्शित करण्याची संधी मिळेल असेही त्यांनी सांगितले. विरेंद्र जाधव यांनी गणेशोत्सवाच्या आगमनापूर्वी या आर्ट गॅलरीच्या गणेश प्रदर्शनाच्या माध्यमातून सुंदर सुंदर गणपतींचे दर्शन झाल्याचे नमूद केले व आभार मानले. भविष्यात गॅलरीसाठी कोणतीही गरज लागल्यास मदत करण्याचेही त्यांनी आश्वासन दिले. कार्यक्रमाची सांगता श्री अनिल कुबल यांच्या आभार प्रदर्शनाने झाली. झुनझुनवाला आर्ट गॅलरी A-1 प्रवासी इंडस्ट्रियल इस्टेट, गेट 4, गोरेगाव पूर्व, मुंबई-63 आणि क्रिएशन आर्ट वर्ल्डचे श्री जयवंत नाईक, श्री अरविंद परुळेकर, श्री छोटुभाई शेख, श्री शांताराम सोनावणे, श्री अनिल कुबल हे संयोजक आहेत. हे कला प्रदर्शन एक ऑगस्ट २०२५ पासून पूर्ण महिनाभर सकाळी १० ते संध्याकाळी ६ पर्यंत सर्वांना पाहता येईल, अशी माहिती श्री. शकील पाठारे यांनी दिली.