सर्वोच्च न्यायालयाने नवाब मलिकांचा जामीन आणखी दोन आठवड्यांनी वाढवला

नवी दिल्ली – माजी मंत्री तथा राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार नवाब मलिक यांचा जामीन वैद्यकीय कारणास्तव आणखी दोन आठवड्यांनी वाढवण्यात आला आहे. नवाब मलिक यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर आज त्याचा शेवटचा दिवस होता. दरम्यान आज सर्वोच्च न्यायालयाकडून त्यांच्या जामीनामध्ये दोन आठवड्यांसाठी वाढ करण्यात आली आहे. दरम्यान, ईडीकडून ईडीच्या वकिलांना न्यायालयामध्ये कोणती भूमिका घ्यायची याबाबत कोणतीही सूचना नसल्याने जामीन वाढवत असल्याचे न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटलं आहे. त्यामुळे अंतरिम जामीन दोन आठवड्यांसाठी वाढवण्यात आला.
मलिक यांनी आज विधान परिषदेच्या निवडणुकीला हजेरी लावली आणि विधानभवनात दाखल होत मतदानाचा हक्क बजावला. मतदानाआधी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांचीही भेट घेतली. त्यामुळे मलिक यांनी नेमकं मतदान कुणाला केलं? याबाबत राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले.
दुसरीकडे, मलिक मनी लाँड्रिंग प्रकरणात वैद्यकीय कारणास्तव अंतरिम जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे नेते नवाब मलिक यांना २०२२ मध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यांच्यावर अंडरवर्ल्ड दाऊद इब्राहिम आणि त्याच्या साथीदारांसोबत पैशांच्या व्यवहाराचा आरोप होता. ईडीचे पथक दाऊद इब्राहिमसोबत पैशाचे व्यवहार आणि त्याच्या बहिणीसोबतच्या जमिनीच्या व्यवहाराचा तपास करत होते.