नवी दिल्ली

उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा ‘एनडीए’ला भक्कम पाठिंबा; शिवसेनेचे मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन

नवी दिल्ली :  उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) भक्कम पाठिंबा आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. दिल्ली दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेच्या सर्व खासदारांसह बुधवारी दुपारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, देशाच्या इतिहासात सलग २,२५८ दिवस सेवा देणारे अमित शाहजी पहिले गृहमंत्री ठरले. यानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की ३७० कलम रद्द करून वंदनीय हिंदूहृदयसम्राट बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करणारे, ऑपरेशन महादेवच्या माध्यमातून दहशतवाद्यांचा खात्मा करणारे, देशातील नक्षलवादाचा बीमोड करणारे आपण सक्षम गृहमंत्री आहेत. सहकारापासून समृद्धीचा ध्यास घेत देशाच्या प्रगतीचा निर्धार करणारे कार्यकुशल, दृढ निश्चयी नेते अशा शब्दांत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी अमित शाह यांना शुभेच्छा दिल्या.

ते पुढे म्हणाले की एनडीए स्थापन होण्यापूर्वीपासून शिवसेना आणि भाजपची युती आहे. ‘एनडीए’मधील सर्वात जुना आणि विश्वासार्ह मित्र म्हणून शिवसेनेची ओळख आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि भाजपा युतीला २५ वर्ष पूर्ण झाली. याबाबत बैठकीत चर्चा झाली. ‘एनडीए’ची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीला खासदार डॉ. श्रीकांत शिंदे उपस्थित होते, असे ते म्हणाले. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत शिवसेनेचा एनडीएला भक्कम पाठिंबा असेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितले. विधानसभा निवडणुकीला महायुती म्हणून यश मिळालं त्याप्रमाणे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणूनच लढणार, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

माधुरी हत्तीणबाबत राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात फेरविचार याचिका दाखल करणार आहे. यात राज्य सरकार आणि वनतारा पक्षकार होतील. या प्रकरणी जनभावना लक्षात घेत सरकार त्याचा आदर करेल, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले. दिल्लीत अधिवेशन सुरु असून येथे येऊन खासदारांना भेटलो, आपण लपूनछपून काही करत नाही, असा टोला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी उबाठाला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!