मुंबईमहाराष्ट्र

लाल किल्ल्यावरून पंतप्रधान पुन्हा खोटे बोलले -हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: दि. १५ ऑगस्ट २०२५
प्रचंड मोठा संघर्ष व हजारो लाखो स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानानंतर देशाला स्वांतत्र्य मिळाले असून काँग्रेसचे नेतृत्व व कर्तृत्व याचे त्यात मोठे योगदान आहे. स्वातंत्र्यासाठी जेव्हा देश लढत होता त्यावेळी जे लोक ब्रिटिशांसोबत होते, पेन्शन घेत होते व ज्या लोकांचा या लढ्यात काहीही सहभाग नव्हता ती शक्ती आज सत्तेवर आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान जे बोलत त्या प्रमाणे वागत होते पण त्याला मागील ११ वर्षात याला बगल देऊन फक्त खोटे बोलले जात आहे. रा. स्व. संघाबद्दल पंतप्रधान आज जे बोलले तेही खोटेच बोलले, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले.

टिळक भवन येथे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे यांच्यासह प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी व सेवादलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सुरुवातीला काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी स्वांतत्र्य दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिला. ते पुढे म्हणाले की, भारताची फाळणी ही एक दुःखद घटना आहे. पंडित जवाहरलाल नेहरु, सरदार पटेल होते म्हणून देश एकसंध राहिला नाहीतर ६०० देश झाले असते. फाळणीचे दुःख आहेच पण भाजपा सरकार १३ ऑगस्टला मंत्रालय रात्रभर उघडे ठेवून फाळणीचा दिवस साजरा करण्याचा फतवा काढते, हा काय प्रकार आहे. १९४२ चे चले जाव आंदोलन सुरु होते तेव्हा रा. स्व. संघ, सावरकर कोठे होते, हे पंतप्रधानांनी सांगायला पाहिजे होते. देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी कोणी मोठी किंमत मोजली हे सर्वांना माहित आहे. देशात आज बेशिस्त वाढली आहे आणि ती काँग्रेसच दूर करु शकते. देशाचा व काँग्रेसचा डीएनए एकच आहे असेही सपकाळ म्हणाले.

महात्मा गांधी, पंडित नेहरु, सरदार पटेल, सुभाषचंद्र बोस, मौलाना आझाद यांचे आपण पाईक आहोत, त्यांचा वारसा आपण पुढे घेऊन जात आहोत, असेही सपकाळ म्हणाले.

तरुणांना १५ हजार रुपये देण्याच्या पंतप्रधानांच्या विधानावर बोलताना सपकाळ म्हणाले की, दरवर्षी २ कोटी नोकऱ्या देऊ, प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू या सारख्या घोषणा यांनीच दिल्या होत्या पण त्याचे पुढे काय झाले हे आपण पाहिले आहे. त्यांचा आतापर्यंतचा अनुभव पाहता ही घोषणा सुद्धा फसवीच ठरेल असेही सपकाळ म्हणाले.
स्वातंत्र्यदिनी मांसाहारावर बंदीबद्दल बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, वन नेशन वन इलेक्शन एवढ्यापुरतेच हे मार्यादित नाही तर वन नेशव वन लिडर, एकच पेहराव, एकच भाषा, एकच टिव्ही चॅनल व एकच व्यंजन ही संकल्पना भाजपाला राबवायची आहे. हा हास्यास्पद प्रकार आहे असे सपकाळ म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!