मुंबईतील रखडलेल्या एसआरए प्रकल्पासाठी वंचित बहुजन आघाडीचा जनआक्रोश मोर्चा!
सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती!

मुंबई – मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्प वर्षानुवर्षे रखडलेले असून, हजारो कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. नागरिकांचे स्थलांतर अर्धवट अवस्थेत थांबले आहे, मूलभूत सुविधा नाहीत आणि विकासाचे आश्वासन केवळ कागदावरच आहे. वारंवार एसआरए व संबंधित अधिकाऱ्यांकडे निवेदने देऊनही, सरकार व प्रशासन कानावर हात ठेवून बसले आहे. ही बेफिकिरी आणि दुर्लक्ष आता नागरिकांना मान्य नाही.
या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीतर्फे 13 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 2 वाजता झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण (SRA) कार्यालय वांद्रे, मुंबई येथील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा केवळ निवेदनापुरता मर्यादित नसून, रखडलेले प्रकल्प मार्गी लागेपर्यंत लढा सुरू राहील, असा इशारा आयोजकांनी दिला आहे.
या मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर, वंचित बहुजन आघाडीचे मुंबई अध्यक्ष चेतन अहिरे, वंचित बहुजन महिला आघाडी मुंबई अध्यक्षा स्नेहल सोहनी करणार आहेत.
नुकतीच एसआरए पीडित कुटुंबियांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. 35 पेक्षा जास्त एसआरए प्रकल्पग्रस्त नागरिकांच्या संघटना या आंदोलनात सहभागी होणार आहेत. प्रकल्पग्रस्तांचे वेगवेगळे प्रश्न या निमित्ताने उचलले जाणार आहेत.
प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन या प्रकरणी मदत करण्याची विनंती वंचित बहुजन आघाडीच्या प्रतिनिधींना केली होती. आजतागायत कुठल्याही राजकीय पक्षाने हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लढा दिला नसल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. हा लढा फक्त वंचित बहुजन आघाडी लढू शकते, असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केला आहे.