महाराष्ट्रमुंबईराजकीय

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर एमपीएससीची परीक्षा २८ सप्टेंबरऐवजी ९ नोव्हेंबरला होणार

मुंबई : राज्यातील काही जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी गावांना पुराने वेढा दिला. अनेक गावांचा संपर्क तुटला. यामुळे अनेक तरुण राज्यसेवा परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे हि परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी करण्यात आली होती. तशी शिफारस राज्य सरकारने आयोगाला केल्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने २८ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा पुढे ढकलली असून आता हि परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयोगाने म्हटले आहे की, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर २०२५ रोजी राज्यातील ३७ जिल्हा केंद्रांवरील ५२४ उपकेंद्रांवर उपकेंद्रांवर घेण्यात येणार होती. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या पूरजन्य परिस्थितीमुळे अनेक जिल्ह्यातील विविध गांवाचा, तालुक्यांचा एकमेकांशी संपर्क तुटलेला आहे. तसेच राज्यातील हवामान खात्याने पुढील काही दिवसांत अतिवृष्टीचा इशारा दिला असून अशा परिस्थितीत कोणताही उमेदवार परीक्षेपासून वंचित राहू नये यासाठी शासनाने केलेल्या विनंतीनुसार प्रस्तुत परीक्षा नियोजित तारखेस न घेता पुढे ढकलण्याचा आयोगाने निर्णय घेतला आहे.

सदर निर्णयानुसार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २८ सप्टेंबर ऐवजी ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येईल. परीक्षेच्या दिनांकातील बदलामुळे ९ नोव्हेंबर रोजी घेण्यात येणारी पूर्वनियोजित महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षेची सुधारित तारीख स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येईल. राज्यात सध्या अतिवृष्टी व पूरस्थितीमुळे हाहाकार माजला आहे. अनेक गावांना पुराचा विळखा पडला आहे. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्वच लहान मोठ्या नेत्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला येत्या २८ सप्टेंबर रोजी होणारी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा लांबणीवर टाकण्याची मागणी केली होती. राज्यातील पूरस्थितीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ही परीक्षा लांबणीवर टाकण्यात यावी, असे त्यांचे म्हणणे होते. त्यानुसार आयोगाने आज २८ सप्टेंबर रोजी होणारी परीक्षा लांबणीवर टाकण्याची घोषणा केली आहे. आयोगाच्या निर्णयानुसार आता ही परीक्षा ९ नोव्हेंबर रोजी होईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!