महाराष्ट्रमुंबई

सरुताई: सुनेच्या रूपातील आई!

निधन पावलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या सूनबाई

मुंबई ( डॉ.अमोल अन्नदाते ) : फोटोतील व्यक्तीचे नाव आहे श्वेता श्रीनिवास सावंत. प्रेमाने आम्ही त्यांना सरुताई म्हणतो. गेल्या आठवड्यात निधन पावलेले ज्येष्ठ पत्रकार पंढरीनाथ सावंत यांच्या सूनबाई. आपल्या आजूबाजूला अनेकदा समाजात ज्येष्ठांना कसं सांभाळलं जात नाही, ज्येष्ठ व्यक्ती म्हणजे जुनं फर्निचर अशा नकारात्मक गोष्टी आपण सतत ऐकत असतो. परंतु यामध्ये श्वेता सावंत यांच्यासारखे अपवाद सुद्धा असतात. आजूबाजूच्या नकारात्मक वातावरणात श्वेता सावंत यांच्यासारखी सूनबाई जेव्हा आपल्या सास-यांना केवळ मुलासारखं नव्हे तर आईसारखं सांभाळते तेव्हा मात्र त्याची फारशी चर्चा होत नाही. म्हणूनच श्वेता सावंत म्हणजेच सरूताईंची ह्रदयस्पर्शी गोष्ट सर्वांसमोर मांडणं मला महत्त्वाचं वाटतं.

नवरा गेल्यावर स्त्री एकवेळ धीर एकवटून आयुष्य जगते, रेटते. परंतु बायको गेल्यावर पुरूषाने एकट्याने तग धरणं कठीण असतं. पंढरीनाथ सावंत यांच्या पत्नी नीलाताई २० वर्षांपूर्वी निवर्तल्या. त्यानंतर पुढील वीस वर्ष पंढरीनाथ सावंत जे काही आयुष्य जगले आणि सक्रीय राहिले त्याचे संपूर्ण श्रेय फक्त आणि फक्त सरुताईंना जाते.

सरुताई हॉस्पीटलमध्ये नोकरी करतात. संसार सांभाळून त्यांनी आपली सर्व मिळकत पंढरीनाथ यांच्या तब्येतीसाठी आणि पोषणासाठी खर्ची केली. शेवटची काही वर्ष जेव्हा पंढरीनाथ सावंत आजारी होते, तेव्हा त्यांची लहान बाळासारखी काळजी घ्यावी लागे. सरुताईंनी तेव्हा त्यांचा सांभाळ, अन्न भरवणं, डायपर बदलणं हे आईच्या मायेनं केलं.

पंढरीकाकांना एकदा मी म्हणालो, “ही तुमची मुलगीच आहे.”
काका म्हणाले, “वेड्या मुलगी कसली, ती आई आहे माझी.”

सून आणि सासरच्या मंडळीमधील नातं हे दुर्दैवाने बदनाम झालेलं नातं आहे. मात्र सरुताईंना पंढरीकाका जेव्हा ‘आई’ म्हणाले, तेव्हा या नात्यामध्येही किती आपलेपणा असू शकतो, हे लक्षात येतं. गरज पडली तर सून ही आईसुद्धा होऊ शकते याचं आगळंवेगळं उदाहरण सावंत कुटुंबामध्ये दिसून आलं. बायको ही क्षणाची पत्नी आणि अंनतकाळाची माता असते ही म्हण आपण ऐकली आहे. पण ‘स्त्रीच्या कोणत्याही नात्यात अनंतकाळाची माता होण्याची क्षमता असते’, ही म्हण सरुताईंच्या निमित्ताने मला जन्माला घालावीशी वाटते.

शेवटच्या काही महिन्यांमध्ये पंढरीकाका बेडवर झोपलेले असताना सरुताई खाली जमिनीवर त्यांच्या शेजारी बसलेल्या असायच्या. पंढरीकाकांना झोपवण्यासाठी त्यांचा हात त्यांच्या डोक्यावरून फिरत असायचा. पंढरीकाका त्रासात असताना सरुताईंनी लहान बाळासारखं थोपटून त्यांना झोपवल्याचा मी साक्षीदार आहे. पंढरीकाकांच्या सुश्रुशेमध्से कितीतरी रात्री जागून काढल्यामुळे सरुताईंच्याही तब्येतीवर त्याचे दुष्परिणाम झाले, पण त्यांनी कधी त्याविषयी कुणाकडे तक्रार केली नाही. मला मात्र डॉक्टर म्हणून ते दिसत होते.

पंढरीकाकांना सरुताई घेत असलेल्या काळजीची पुरेपूर कल्पना होती. सरुताईंविषयी पंढरीकाकांच्या मनात एवढा आदर होता की घरी कुणी मोठ्या हस्ती आल्या की फोटोसाठी सरुताईंनाही सोबत घ्या, असा त्यांचा आग्रह असायचा. शेवटच्या काही वर्षात पंढरीकाका कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमांना जाण्याच्या स्थितीत नव्हते, त्यावेळी त्यांना मिळालेले पुरस्कार, जीवनगौरव सन्मान स्वीकारण्याचा मान आपल्यावतीने त्यांनी सरुताईंना दिला होता.

पंढरीकाकांना सरुताईंची प्रचंड काळजी असायची. ते मला म्हणायचे की, “अमोल सरुताईसोबत नेहमी भावासारखा उभा राहा. तिला अंतर देऊ नकोस.” पंढरीकाका गेले त्या शेवटच्या रात्री पहाटे तीन वाजता उठून त्यांनी पाणी मागितलं तेसुद्धा सरूताईना. सरुताई पुढे तासभर त्यांच्या शेजारी बसून होत्या. शेवटच्या क्षणी ते गुंगीत जात असतानाही सरुताई हेच नामस्मरण त्यांच्या मुखी होते आणि जग सोडताना त्यांच्या तोंडून शेवटचा शब्द निघाला तोही सरुताई.

सरुताईं हे नाव इतके त्यांच्या तोंडी बसले होते की कार्यालयातही कुठल्याही मुलीला हाक मारताना तिला सरुताईच म्हणायचे. अर्थात सरुताईसुद्धा त्यांची पोटच्या पोरासारखी काळजी घेत. शाळेत गेलेल्या लहान मुलाची पाण्याची बाटली आणि डबा आई घरी आल्यावर ज्याप्रमाणे तपासते तसंच सरुताई कामावारून आल्यावर पंढरीकाकांनी जेवण, पाणी नीट केलंय की नाही पाहायच्या, अन्यथा त्यांच्यावर रागवायच्या. म्हणूनच पंढरीकाकासुद्धा सरुताईंच्या सूचनांचे तंतोतंत पालन करायचे.

पंढरीनाथ सावंत हे असामान्य व्यक्तिमत्व, पत्रकार, लेखक होते. त्यांची काळजी घेताना आपण समाजाच्या संपत्तीचा सांभाळ करतोय ही भावना सरुताईंमध्ये होती. कर्मसंचितावर माझा प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच मी म्हणेन की, पंढरीकाकांची सेवा करून पुढील कित्येक जन्मांचे पुण्य सरुताईंनी या एकाच जन्मात आपल्या पदरी पाडून घेतले आहे.

जगभरातील शक्तीशाली स्त्रीयांच्या याद्या आपण वाचत असतो. पण माझ्यादृष्टीने भारतातील मोस्ट पॉवरफूल, श्रीमंत स्त्री सरुताई आहे. आपल्या आजूबाजूला अशा आदर्श आणि पुण्यवान सुनांची उदाहरणे फार तुरळक आहेत. म्हणून घरातील ज्येष्ठांना सांभाळण्यासाठी सरुताईंचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे.

सरुताईंसारख्या व्यक्ती समाजासाठी आदर्श असायला हव्यात. त्यासाठी अशा कहाण्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायला हव्यात, त्यांना ग्लॅमर मिळवून द्यायला हवं. ही पोस्ट तुम्ही इथपर्यंत वाचली असेल तर ही पोस्ट शेअर करून तुम्ही त्यांना मानवंदना देऊ शकता.

“माँ तुझे सलाम!”
याऐवजी मी म्हणेण
“सरूताई तुझे सलाम!”

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!