महाराष्ट्रमुंबई

राज्यात झालेल्या अतिवृष्टीचा विचार करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये तातडीची मदत द्या: हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राज्यात मागील तीन चार दिवसात मुसळधार पावसाने अनेक भागात पुरस्थिती उद्भवली आहे. या पावसाचे पाणी शेतात शिरून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, उभी पिके वाहून गेली आहेत. अतिवृष्टीमुळे राज्यातील जवळपास १५ लाख एकर पेक्षा जास्त क्षेत्रावरील शेतपिकांचे प्रचंड मोठे नुकसान झाल्याचे समजते. राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची तातडीने मदत द्या, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ पुढे म्हणतात की, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील जवळपास १७ जिल्ह्यांना या पावसाचा मोठा फटका बसला आहे, उत्तर महाराष्ट्र व कोकणातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ज्वारी, बाजरी, उडीद, मका, सोयाबिन, मूग, कापूस, तूर, फळे व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो हेक्टरवरील ऊसालाही मोठा फटका बसला आहे, काही ठिकाणी शेतकऱ्याचे पशूधन वाहून गेले आहे तर नांदेड जिल्ह्यात जिवीतहानीही झाली आहे. आधीच संकटाचा सामना करत असलेल्या बळीराजाला निसर्गाने आणखी संकटात टाकले आहे.

राज्य सरकारने पंचनामे करण्याचे आदेश दिले असले तरी सरकारने या कठीण प्रसंगी सर्व नियम, अटी व शर्थी बाजूला ठेवून शेतकऱ्यांची मदत केली पाहिजे. जेथे जिवीतहानी झाली आहे त्यांच्या कुटुंबियांचा सहानुभूतीपूर्ण विचार करून मदत करावी अशी काँग्रेस पक्षाची मागणी आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!