कासवांच्या घरट्यांची आणि पिल्लांची नोंदी करण्यासाठी आलंंय एम टर्टल ऍप

रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, राजापूर, रत्नागिरी, गुहागर हे चार तालुके कासव संवर्धन करणारे तालुके म्हणून नावारूपाला येत आहेत. कासवांच्या घरट्यांची आणि पिल्लांच्या नोंदी करण्यासाठी एम टर्टल ऍप तयार करण्यात आले आहे. अशा प्रकारचे भारतातील पहिले ऍप असून या ऍपमुळे कासवांच्या घरट्यांची आणि त्यातून बाहेर पडणार्या पिल्लांच्या संख्येची नोंद होण्यामध्ये सूसुत्रता येणार असून जगातून कोठूनही माहिती मिळणार आहे.
महाराष्ट्रातील किनार्यांवर सागरी कासव संरक्षण मोहीम सन २००३ पासून सुरू आहे. यासाठी वनविभागाने कासव मित्रांची नेमणूक केली आहे. भारतीय सागर किनार्यांवर ऑलिव्ह रिडले, ग्रीन टर्टल, हॉक बिल, लॉगर हेड या चार जातींची समुद्री कासवे आढळून येतात.त्यांची नोंदणी या ऍपद्वारे शक्य होणार आहे.
कासवांचे संरक्षण आणि संवर्धन करणे यामुळे शक्य होणार आहे.हे ऍप येत्या काळात कासवांच्या प्रजातींसाठी महत्वाचे ठरणार आहे.