मुंबई

महाराष्ट्राच्या तिजोरीवर सरकारचा दरोडा…!

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा घणाघात

मुंबई – राज्यात एकही गृहप्रकल्प न राबविलेल्या चढ्ढा नावाच्या खासगी विकासकाला पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली राज्य सरकारने बिनव्याजी ४०० कोटी रुपये मंजूर केलेला निर्णय म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीवर जाता-जाता घातलेला दरोडा आहे, असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी येथे केला. त्यामुळे आता मुख्यमंत्री लाडका कंत्राटदार नंतर मुख्यमंत्री लाडका बिल्डर योजना महाराष्ट्रात येणार आहे का? असा सवाल करत वडेट्टीवार यांनी सरकारच्या भ्रष्ट कारभारावर टीकाही केली.

गृहनिर्माण विभागाचा विरोध डावलून राज्य सरकारने पंतप्रधान आवास योजनेच्या नावाखाली मे.चढ्ढा डेव्हलपर्स आणि प्रमोटर या कंपनीला सोलापूर येथे गृहनिर्माण प्रकल्प राबविण्यासाठी ४०० कोटी रुपये बिनव्याजी उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला असून या निर्णयावर वडेट्टीवार यांनी आज पत्रकार परिषदेत सडकून टीकाही केली.गृहनिर्माण विभागाने असा निधी देण्यास विरोध दर्शविला असतानाही त्यानंतरही हा निधी देण्यासाठी कोण दबाव आणत आहे, याची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली.

दिल्लीस्थित कंपनीवर ही मेहेरनजर दाखविण्याचा निर्णय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मान्य आहे काय? २०२१ मध्ये या विकासकाशी म्हाडाने करार केला. मात्र विकासकाने आतापर्यंत एकाही घराचा ताबा लाभार्थीना दिलेला नाही.असे असताना त्याला ४०० कोटींची खिरापत का वाटली जात आहे? असाही रोखठोक सवाल वडेट्टीवार यांनी केला. सीबीआयने कारवाई केल्यावर तुरूंगात गेलेला डिंपल चढ्ढा हा बांधकाम व्यावसायिक राज्य सरकारचे पैसे घेऊन परदेशात पळून गेला तर? अशी शंकाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

बार्टीच्या विद्यार्थ्यांना दोन वर्षापासून शिष्यवृत्ती नाही. विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. मुख्यमंत्र्यांकडे बैठक झाली तरी देखील सरकारला जाग येत नसून सरकारची विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्यायची मानसिकता नाही. कारण कमिशन, टक्केवारी जिथे मिळत नाही तिथे सरकार पैसे खर्च करत नाही,अशी या सरकारच्या कामाची पद्धत आहे. महाज्योती आणि सारथी या संस्थांच्या विद्यार्थ्यांची देखील अशीच परिस्थिती असल्याची टीका करत वडेट्टीवार यांनी यासर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्याचीही मागणी त्यांनी केली.

दरम्यान, विदर्भात पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.गडचिरोली, चंद्रपूर येथील अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. नागपूर परिसरात देखील अशीच परिस्थिती आहे.त्यामुळे लोकांना सुरक्षित स्थळी हलवून त्यांच्या निवारा,जेवण, आरोग्याची व्यवस्था करावी.पशुधन देखील अडचणीत सापडले असून ते वाचविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. परिस्थिती नियंत्रणात आल्यावर राज्य सरकारने तात्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्तांना मदत करावी, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी यावेळी केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!