महाराष्ट्रमुंबई

ग्राहकाने मास्क न घातल्यास, दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी- आमदार मंगलप्रभात लोढा

मुंबई- ग्राहकाने दुकानात मास्क न वापरल्यास ग्राहकास फक्त रु. ५०० दंड परंतु संबंधित दुकान अथवा आस्थापनेला १० हजार रुपयांचा दंड करण्याचा निर्णय राज्य सरकारने तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष, आमदार मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली भाजपा व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांची भेट घेऊन केली. ग्राहकाने मास्क न घातल्यास दुकानदारांना दहा हजारांचा दंड म्हणजे पद्धतशीर लूटच असून हा प्रकार म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी आहे अशी खरमरीत टीका आमदार श्री. लोढा यांनी यावेळी केली.

दुकानदारांना दहा हजार रुपये दंड आकारण्याचा राज्य सरकारचा हा निर्णय अन्यायकारक असून या निर्णयामुळे दुकानदारांना मोठा आर्थिकफटका बसणार आहे. तसेच लहान दुकानदारांची गैरसोय होणार आहे. या निर्णयामुळे भ्रष्टाचाराचे नवे कुरण निर्माण होईल याकडेही भाजपा व्यापारी सेलच्या शिष्टमंडळाने लक्ष वेधले.

या निर्णयामुळे छोट्या दुकानदारांना दुकान बंद करण्याशिवाय पर्याय उरणार नाही कारण दंडाची रक्कम दुकानदाराच्या कमाईपेक्षा अधिक आहे. त्यामुळे या नियमांत सुधारणा करून दुकानदारांना न्याय द्यावा अशी अपेक्षा आमदार श्री. लोढा यांनी व्यक्त केली. यावेळी स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट, अजय पाटील,मुंबई भाजपा व्यापारी सेलचे अध्यक्ष जयेश जरीवाला, मुंबई भाजपा व्यापारी सेलचे महामंत्री जयेश जोशी, मुंबई भाजपा व्यापारी सेलचे महामंत्री अल्पेश शहा, मुंबई भाजपा व्यापारी सेलचे उत्तर पश्चिम जिला अध्यक्ष प्रदीप शर्मा, सवेश प्रतापसिंह आदी उपस्थित होते. अतिरिक्त आयुक्त संजीवकुमार यांनी या निर्णयाबाबत सकारात्मक विचार करण्यात येईल अशी ग्वाही यावेळी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!