विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांच्याकडून एक वही, एक पेन अभियानास बळ; शैक्षणिक साहित्य केले सुपूर्द

मुंबई : समाजातील गरजू विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्या एक वही,एक पेन अभियानास बळ देण्यासाठी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी आज शैक्षणिक साहित्य सुपूर्द केले. समाजातील आर्थिक दुर्बल आदीवासी व गरजू विद्यार्थ्यांना एक वही,एक पेन अभियानच्या वतीने शैक्षणिक साहित्यांचे वितरण करण्यात येते.सार्वजनिक उत्सव, महापुरूषांची जयंती, गणेशोत्सव नवरात्रोत्सव व मान्यवरांच्या वाढदिवसाला शैक्षणिक साहित्य द्यावे असे आवाहन एक वही,एक पेन अभियानच्या वतीने करण्यात येते.
सदर साहित्य समाजातील गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे काम अभियानच्या वतीने मागील दहा वर्षांपासून करण्यात येते.जमा झालेले शैक्षणिक साहित्य दुर्गम आदीवासी पाडे,तसेच आर्थिक दुर्बल, वंचित घटकातील विद्यार्थ्यांना वितरित केले जाते. विधानपरिषद उपसभापती डाॅ.नीलमताई गो-हे यांचा वाढदिवस नुकताच संपन्न झाला. वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हारफुले, बुके, केक, व भेटवस्तू न देता शैक्षणिक साहित्य देण्यात यावे.जेणेकरून गरजू विद्यार्थ्यांना त्याचा लाभ देता येईल असे आवाहन डॉ. गोऱ्हे यांनी केले होते.त्यांच्या या सामाजिक बांधिलकीच्या आवाहनाला शुभेच्छुकांकडून उदंड प्रतिसाद मिळाला.जवळपास एक हजाराच्या वर शैक्षणिक साहित्य यावेळी गोळा झाले.
सदर साहित्य डॉ.गोऱ्हे यांनी आज एक वही,एक पेन अभियानचे प्रमुख, ज्येष्ठ पत्रकार राजू झनके,शंकर कांबळे व त्यांच्या सहका-यांकडे सुपूर्द केले. दरम्यान डॉ.गोऱ्हे यांच्या सामाजिक दायित्वाची एकच चर्चा सर्वत्र होत आहे.सार्वजनिक जीवनात कार्यरत सर्वच सामाजिक ,राजकीय धुरिणांनी असा आदर्श उपक्रम राबविल्यास समाजातील वंचित घटकांच्या शिक्षणाला हातभार लागू शकेल,असा आशावाद व्यक्त करण्यात येत आहे.