राष्ट्रीय

“एक देश एक निवडणूक लवकरच” –पंतप्रधान

देशात समान नागरी कायदाही प्रस्तावित

अहमदाबाद – भारतात एक देश एक निवडणूक यावर काम सुरू असून लवकरच त्यावर अंमलबजावणी केली जाईल. तसेच सरकार समान नागरी कायद्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते आज, गुरुवारी गुजरातच्या केवडिया येथे बोलत होते. पंतप्रधान दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 149 व्या जयंती निमित्त आयोजित राष्ट्रीय एकदा दिवस समारंभात सहभाग घेतला. केवडिया येथील पटेलांच्या स्टॅच्यु ऑफ युनिटी येथे आदरांजली अर्पण केल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की,यावेळी राष्ट्रीय एकता दिवस एक अद्भुत योगायोग घेऊन आला आहे. एकीकडे आपण एकात्मतेचा उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे दिवाळीचा सण आहे. हा दुहेरी आनंदाचा क्षण असल्याचे मोदींनी सांगितले. तसेच ‘वन नेशन, वन इलेक्शन’वरकाम करत आहोत. याला लवकरच मंजुरी दिली जाईल आणि ते प्रत्यक्षात आणले जाईल. या निर्णयामुळे भारताची लोकशाही मजबूत होईल. तसेच विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी देशाला नवी गती मिळेल.

या वर्षाच्या सुरुवातीला मंत्रिमंडळाने या प्रस्तावाला मंजुरी दिली होती आणि या वर्षाच्या अखेरीस संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा प्रस्ताव मांडला जाईल. तसेच भारत आता समान नागरी कायद्याच्या या दिशेने वाटचाल करत आहे, असेही मोदींनी स्पष्ट केले. भाजप सरकारने जम्मू-काश्मिरातून कलम 370 कायमचे हटवले. या विधानसभा निवडणुकीत प्रथमच तिथे कोणत्याही भेदभावाशिवाय मतदान झाले. तेथील मुख्यमंत्र्यांनी पहिल्यांदाच भारतीय राज्यघटनेची शपथ घेतली. हे दृश्य भारतीय राज्यघटनेच्या शिल्पकारांना खूप आनंद देणारे असेल. त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल आणि हीच आमची राज्यघटना शिल्पकारांना विनम्र श्रद्धांजली असल्याचे मोदींनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!