विभा फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची मोठी मोहीम ; पर्यावरण तज्ज्ञ सुधीर थोरवे यांचे कल्पवृक्षासम कार्य

मुंबई (प्रतिनिधी) : पर्यावरण संवर्धन काळाची गरज आहे हे सर्वज्ञात आहे. मानवाने आधुनिकीकरण साधतांना पर्यावरणाकडे दुर्लक्ष केले. त्याचाच परिणाम म्हणजे ऋतुमानातील बदल, अचानक येणारी वादळं, पूर त्याचा परिचय निसर्ग आपल्याला सातत्याने करून देत आहे. यादृष्टीने नवी मुंबई येथील पर्यावरण तज्ज्ञ सुधीर थोरवे यांनी विभा फाउंडेशनच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाची मोठी मोहीम हाती घेतली असून हजारो वृक्षांची लागवड केली आहे.
आज विविध पातळ्यांवर जागतिक स्तरावर पर्यावरण संवर्धनासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात आहेत हे जरी खरे असले तरी होणारे प्रयत्न अगदी अपुरेच आहेत.
पर्यावरण संवर्धनाचा एक भाग म्हणून नवी मुंबई येथील पर्यावरण तज्ज्ञ सुधीर थोरवे आणि त्यांचे कुटुंबीय, त्यांची मित्र मंडळी आणि सहकारी मागील कित्येक वर्षापासून ह्या क्षेत्रात काम करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे वृक्ष लागवड, मागील बारा वर्षात वन विभागाच्या सहकार्याने त्यांनी जवळजवळ अडीच हजार वृक्षांची लागवड केलेली आहे. विशेष म्हणजे या ग्रुपने विभा फाउंडेशनची स्थापना करून हा उपक्रम अधिक जोशाने करायचे ठरविले आहे.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कर्जत मधील वांजळे येथील वन परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम नुकताच मोठ्या प्रमाणावर केला. वय वर्ष दहा ते पासष्ट वयोगटातील ७५ मंडळींनी एकत्रित येऊन कौटुंबिक वातावरणात जवळजवळ अडीचशे वृक्षांची लागवड केली. मागील चार वर्षाच्या मुख्य प्रयत्नांतून बोडक्या डोंगराला एका अगळ्या वेगळ्या हिरवाईचे स्वरूप या ग्रुपच्या प्रयत्नातून लाभले आहे.
आपल्या दैनंदिन कामकाजातून बाहेर पडून कुदळ, फावडे घेऊन वृक्ष लागवडीसाठी खड्डे खोदतांना प्रत्येक जण आपापल्या परीने श्रमदान करीत होते. हिरवेगार गालिचे पांघरलेला परिसर, सभोवतालील डोंगरांच्या रांगा त्यामधून वाहणारे धबधबे, अधून मधून येणाऱ्या पावसाच्या सरी अशा निसर्गरम्य वातावरणात या समूहाने वृक्षांची लागवड केली. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर त्यांनी केलेले श्रमदान आणि पर्यावरण संवर्धनासाठी केलेला प्रयत्न याचा आनंद जाणवत होता. वनाधिकारी समीर खेडकर, जितेंद्र चव्हाण, कर्जत येथील शरद पवार, तसेच विलास आचरेकर यांचे सहकार्य या मोहिमेसाठी लाभले. विशेष म्हणजे स्थानिक आमदारांचे खाजगी सचिव डॉक्टर राजू थोरवे यांची उपस्थिती सगळ्यांना प्रोत्साहन देऊन गेली.
वृक्ष लागवडीनंतर श्रमदानाचा थकवा घालविण्यासाठी ग्रुपमधील बऱ्याच जणांनी शेजारी खळखळ वाहणाऱ्या नदीच्या निखळ प्रवाहात मनसोक्त डुंबण्याचा आनंद घेतला.
वनभोजन करतांना विलास आचरेकर, सुधीर थोरवे तसेच इतर मित्रमंडळींनी आपल्या गाण्यांनी सगळ्यांनाच मंत्रमुग्ध केले. वनभोजनाची व्यवस्था वैशाली थोरवे, शैला आचरेकर, सरिता बेनकर आणि ज्योती काशीद यांनी चोख बजावली.
उपस्थित कुटुंबीयांमध्ये हर्ष आचरेकर, मनीषा करणे, अजय भल्ला, हितेश भट, लता शेलटे, चारुलता लंकेश, निखिल देवरे, सागर म्हात्रे, कुंजला पाटील,कौतुभ भास्कर, चेतन जलाल, श्रेया राजलक्ष्मी, माधुरी प्रभुलकर, मंदा दळवी, सचिन कांबळे, जितेंद्र पाठक, सूर्यकांत लोखंडे, रवी गवळी, प्रशांत गायकवाड, अनिल आणि मच्छिंद्र पाटील, जयप्रकाश लबडे, देवेंद्र भुजबळ, दीपिका मंडल, सर्वणा प्रभू, विशाल भारत तसेच या कुटुंबीयासमवेत आलेले त्यांच्या यंग ब्रिगेडने या वृक्ष लागवडीसाठी फारच मेहनत घेतली. ह्या सगळ्या सहकाऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आगळावेगळा आनंद दिसत होता. पर्यावरण जागरूकता निर्माण करण्यासाठी तसेच पर्यावरण संवर्धनासाठी केलेला एक छोटासा प्रयत्न या सगळ्यांनाच एक आगळे वेगळे समाधान देऊन गेला असल्याचे मनोगत सर्वांनी व्यक्त करतांनाच दरवर्षीप्रमाणे पुढील वर्षी सुद्धा येण्याचा संकल्प केला असल्याचे पर्यावरण तज्ञ सुधीर थोरवे यांनी सांगितले.






