देशविदेशमहाराष्ट्रमुंबईराजकीय

भारत-ब्रिटन भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांचे संयुक्त निवेदन, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी

मुंबई : भारत आणि ब्रिटन वेगवेगळ्या क्षेत्रात नैसर्गिक भागीदार आहेत. या संबंधांना लोकशाही, स्वातंत्र्य आणि कायद्याचे राज्य यासारख्या मूल्यांवरचा परस्पर सामायिक विश्वास आहे. सध्याच्या जागतिक अस्थिरतेच्या काळात, भारत आणि ब्रिटन दरम्यानची ही वाढती भागीदारी जागतिक स्थैर्य आणि आर्थिक प्रगतीसाठी महत्त्वाचा आधार ठरली आहे. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील संबंध अधिक दृढ झाले असून, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण आणि संरक्षण क्षेत्रात अभूतपूर्व संधी निर्माण झाल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितले. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर हे दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. मुंबईतील राजभवन येथे आज त्यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा झाली. या चर्चेनंतर नरेंद्र मोदी व कीर स्टार्मर यांनी संयुक्त निवेदन जारी केले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी बोलत होते.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, यावर्षी जुलै महिन्यात माझ्या ब्रिटन दौऱ्यादरम्यान ऐतिहासिक सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारावर (CETA) सहमती दर्शविली. या करारामुळे व्यापार आणि रोजगार निर्मिती वाढेल आणि ग्राहक तसेच उद्योग क्षेत्र दोघांनाही लाभ मिळेल. ब्रिटनचे पंतप्रधान आणि त्यांच्यासोबत आलेले आतापर्यंतचे सर्वात मोठे व्यावसायिक प्रतिनिधी मंडळ ही भागीदारीतील नव्या ऊर्जेचे द्योतक असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले. दोन्ही देशांतील उद्योगक्षेत्रातील प्रतिनिधींची शिखर परिषद, सीईओ मंच आणि जागतिक फिनटेक महोत्सव यांच्या माध्यमातून सहकार्याच्या नव्या शक्यता समोर आल्याचेही त्यांनी नमूद केले.

प्रधानमंत्री मोदी म्हणाले, आजच्या बैठकीत दोन्ही नेत्यांमध्ये इंडो-पॅसिफिक आणि पश्चिम आशियातील स्थैर्य, तसेच युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षावरही विचारांची देवाणघेवाण झाली. युक्रेन आणि गाझाच्या मुद्द्यावर भारत संवाद आणि मुत्सद्देगिरीच्या माध्यमातून शांतता पुनप्रस्थापित करण्यासाठीच्या सर्व प्रयत्नाचे समर्थन करतो. इंडो पॅसिफिक क्षेत्रात सागरी सुरक्षा विषयक सहकार्य वाढविण्यासाठी वचनबद्ध असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले.

तंत्रज्ञान क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये अमर्याद सहकार्याची क्षमता असल्याचे सांगत प्रधानमंत्री मोदी म्हणाले, आम्ही ब्रिटनची औद्योगिक तज्ञता आणि संशोधन क्षमता भारताच्या प्रतिभा व व्याप्तीशी जोडत आहोत. गेल्या वर्षी सुरू केलेल्या भारत-ब्रिटन तंत्रज्ञान सुरक्षा उपक्रमातून नवोन्मेषाला चालना मिळत आहे. खनिज क्षेत्रातील सहयोगासाठी नवीन उद्योग संघ स्थापन केला जात असून त्याचा सॅटेलाईट कँपस आयएसएम धनबाद येथे असणार आहे, अशी माहितीही प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी दिली. शाश्वत विकासासाठी दोन्ही देशांनी भारत-युके ऑफशोअर विंड टास्कफोर्स आणि हवामान तंत्रज्ञान स्टार्टअप निधी स्थापन केल्याचेही त्यांनी सांगितले. प्रधानमंत्री मोदी म्हणाले, ब्रिटनमधील नऊ विद्यापीठे भारतात त्यांचे कॅम्पस सुरू करत आहेत. साऊदम्टन विद्यापीठाच्या गुरूग्राम कॅम्पसचे उद्घाटन झाले असून, गिफ्ट सिटीमध्ये आणखी तीन विद्यापीठांच्या शाखा उभारल्या जात आहेत.

भारत आणि युके यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट
भारत आणि युके यांच्यातील संरक्षण सहकार्य अधिक बळकट होत असून, दोन्ही देश संयुक्त उत्पादनाच्या दिशेने पावले टाकत आहेत. याशिवाय, दोन्ही देशांच्या सैन्यदलांमध्ये सैन्य प्रशिक्षण सहकार्य करार झालेला असून, त्याअंतर्गत भारतीय वायुसेनेचे उड्डाण प्रशिक्षक आता युकेच्या रॉयल एअरफोर्समध्ये प्रशिक्षक म्हणून काम करणार आहेत. मुंबईत बैठक चालू असताना, आपल्या नौदलांची जहाजे ‘कोंकण २०२५’ हा संयुक्त सराव करत आहेत. हा आमच्या मजबूत सामरिक सहकार्याचा पुरावा असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी नमूद केले.

युकेमध्ये वास्तव्यास असलेले १८ लाख भारतीय हे दोन्ही देशांमधील मैत्रीचे जिवंत उदाहरण आहे. त्यांनी ब्रिटिश समाज आणि अर्थव्यवस्थेत दिलेले योगदान अत्यंत मोलाचे असून दोन्ही देशांतील मैत्री आणि विकासाच्या पुलाला बळकटी दिली आहे, असेही प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी सांगितले. भारताची गतिशीलता आणि युकेची तज्ञता मिळून एक अद्वितीय सुसंवाद निर्माण होतो. आमची भागीदारी प्रतिभा, तंत्रज्ञान आणि विश्वासावर उभी आहे. आम्ही दोन्ही देशांच्या लोकांसाठी उज्ज्वल भविष्य घडवू, असा विश्वास प्रधानमंत्री मोदी यांनी यावेळी व्यक्त केला.

भारत-युके भागीदारीचा नवा अध्याय : मानवी नात्यांचा सेतू अधिक मजबूत करण्याची वचनबद्धता – ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर
भारत आणि ब्रिटन यांच्यातील मानवी बंध हेच या नात्याचे खरे वैशिष्ट्य आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे, हे दोन देशांदरम्यानचे, लोकांदरम्यानचा, मनांदरम्यानचा जिवंत पूल आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी आज मुंबईत आयोजित द्विपक्षीय बैठकीनंतर जारी केलेल्या संयुक्त निवेदनादरम्यान सांगितले. कीर स्टार्मर म्हणाले, भारत-युके एकत्र येऊन आधुनिक आणि भविष्याभिमुख भागीदारी निर्माण करत आहेत. यामुळे दोन्ही देशांच्या नागरिकांसाठी नव्या संधी निर्माण होतील. युके-भारत सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार (CETA) पूर्ण करणे हा ऐतिहासिक टप्पा आहे. या करारामुळे आयात शुल्क कमी होईल, बाजारपेठांमध्ये अधिक प्रवेश मिळेल, रोजगारनिर्मिती होईल आणि दोन्ही देशांतील जनतेचे जीवनमान उंचावणार आहे.

कराराच्या आर्थिक लाभांपलीकडे जाऊन, या प्रक्रियेत निर्माण झालेला आत्मविश्वास आणि परस्पर सहकार्याचा भाव हे भारत-युके संबंध अधिक दृढ करत असल्याचेही कीर स्टार्मर यांनी नमूद केले. ही बैठक भारताची आर्थिक राजधानी मुंबईत होत आहे, हे प्रतीकात्मक आहे. भारताची आर्थिक प्रगती विलक्षण आहे. २०२८ पर्यंत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट आणि ‘विकसित भारत २०४७ या दृष्टिकोनाबद्दल मी प्रधानमंत्री मोदी यांचे अभिनंदन करतो. या प्रवासात आम्ही भारताचे भागीदार व्हावे, ही आमची इच्छा आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. या भेटीदरम्यान भारत-युके व्यापार कराराच्या संधींना वास्तवात आणण्यासाठी ब्रिटनकडून १२६ कंपन्यांचे सर्वात मोठे व्यावसायिक प्रतिनिधीमंडळ भारतात आले असल्याची माहिती त्यांनी दिली.

कीर स्टार्मर म्हणाले, युके आणि भारत हे तंत्रज्ञान आणि नवोन्मेष क्षेत्रातील आघाडीचे देश आहेत. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्ता, प्रगत संवाद व्यवस्था, संरक्षण तंत्रज्ञान यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहकार्य अधिक मजबूत करण्याचा आमचा संकल्प आहे. बॉलीवूड चित्रपटांचे चित्रीकरण युकेमध्ये करण्यासाठी करार जाहीर करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात भागीदारी वाढवण्याच्या दृष्टीने सर्व ब्रिटिश विद्यापीठे भारतामध्ये आपले कॅम्पस सुरू करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. यामुळे ब्रिटन भारताचा अग्रगण्य आंतरराष्ट्रीय शिक्षण भागीदार बनेल आणि व्हिजन २०३५ ला मूर्त रूप मिळेल, असेही ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!