बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने जिंकले ऐतिहासिक सुवर्णपदक

बुडापेस्ट – भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाड २०२४ मध्ये ऐतिहासिक कामगिरी करत पुरुष आणि महिला दोन्ही संघांनी सुवर्णपदक पटकावले. हे भारताच्या बुद्धिबळ इतिहासातील एक मोठे यश ठरले आहे. ही पहिलीच वेळ आहे की भारताने दोन्ही विभागात सुवर्ण जिंकले आहे. पुरुष संघाने ओपन सेक्शनमध्ये पहिल्यांदाच सुवर्णपदक जिंकले. अखेरच्या फेरीत स्लोवेनियावर ३.५-०.५ ने विजय मिळवत, त्यांनी सुवर्णपदक निश्चित केले. यामध्ये डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, अर्जुन इरीगेसी, विदित गुजराथी आणि पी. हरिकृष्णा यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विशेष म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत भारतीय पुरुष संघाला एकही पराभवाचा सामना करावा लागला नाही. उझ्बेकिस्तानविरुद्धची लढत २-२ ने बरोबरीत सुटली होती, पण बाकी सर्व लढती त्यांनी जिंकल्या.
महिला संघानेही अझरबैझानविरुद्ध अखेरच्या फेरीत ३.५-०.५ ने विजय मिळवत सुवर्णपदक निश्चित केले. हरिका द्रोणावल्ली, दिव्या देशमुख, वंतिका अग्रवाल आणि आर. वैशाली यांनी महिला विभागात महत्त्वाची भूमिका निभावली. महिला संघाला फक्त पोलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला, तर अमेरिकेविरुद्धची लढत बरोबरीत सुटली.
भारताच्या या कामगिरीबद्दल देशभरातून कौतुकाचा वर्षाव झाला आहे. राजकारणी, उद्योजक आणि चाहत्यांनी भारतीय संघांचे अभिनंदन केले आहे. राहुल गांधी, आनंद महिंद्रा यांसारख्या मान्यवरांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या सुवर्ण कामगिरीमुळे भारताचे बुद्धिबळ क्षेत्रातील वर्चस्व आणखी दृढ झाले आहे, विशेषतः आगामी काळात डी. गुकेश जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत डिंग लिरेनविरुद्ध खेळणार असल्याने भारतीय बुद्धिबळावर जगभरात लक्ष केंद्रित झाले आहे.