महाराष्ट्रमुंबईराजकीय

माथाडी कामगारांची हक्काची ‘विशाल सह्याद्री नगर’ वसाहत धोक्यात? पुनर्विकासाच्या नावाखाली भूखंड गिळंकृत करण्याचा कट!

​मुंबई : माथाडी कामगारांच्या हक्काचे घर आणि अस्मितेचे प्रतीक असलेल्या कांदिवली-चारकोप येथील विशाल सह्याद्री नगर (Vishal Sahyadri Nagar) या २७ एकर भूखंडावर पुन्हा एकदा खासगी विकासकाचे आणि कथित ‘मोठ्या भांडवलदारांचे’ सावट आले आहे. पुनर्विकासाच्या गोंडस नावाखाली कामगारांना देशोधडीला लावून हा मौल्यवान भूखंड बळकावण्याचा मोठा कट शिजत असल्याचा आरोप शिवराज्य ब्रिगेडचे अध्यक्ष तथा मराठा क्रांती मोर्चा मुंबईचे समन्वयक अमोल (भैय्या) जाधवराव यांनी केला आहे.

​मुंबईतील माथाडी कामगारांसाठी शासनाने दिलेला २७ एकरचा हा भूखंड मुंबईतील अशा प्रकारचा एकमेव मोठा भूखंड आहे. एकेकाळी धोतर-टोपीतील गावाकडचा गावकरी या नगरात मोकळा श्वास घेत होता. गावासारखं मोकळं वातावरण, प्रशस्त मैदान ही या कामगार वसाहतीची खरी ओळख होती. मात्र, काही वर्षांपासून मूळ माथाडी कामगार आपली घरे विकून येथून हद्दपार झाले आहेत. यामागे कामगार नेते आणि राजकीय नेत्यांनीच कामगारांना फसवलं, असा थेट आरोप केला जात आहे. भूखंडाच्या वापराच्या अटी-शर्तींचे वारंवार उल्लंघन झाल्याच्या नोटिसा उपनगर जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी बजावल्या होत्या.

​अमोल जाधवराव यांच्या म्हणण्यानुसार, आता नमन बिल्डर (Naman Builder) नावाचा एक मोठा विकासक या भूखंडाच्या पुनर्विकासासाठी मैदानात उतरला आहे. ​या योजनेत सध्या वस्तीत राहणाऱ्या तब्बल २५०० कुटुंबांना केवळ ५ एकर जागेत सामावून घेण्याची योजना आहे. ​या पुनर्विकासामुळे उर्वरित २२ एकर जागा विकासकाच्या घशात घालण्याचा हा डाव आहे. ​जाधवराव यांचा आरोप आहे की, नमन बिल्डर हा केवळ मोहरा आहे. या भूखंडामागे ‘अदानी’ (Adani) समूहासारख्या मोठ्या भांडवलदाराची खरी योजना असून, कामगारांना मुंबईतून कायमचे बाहेर काढण्याचा हा राजकीय-आर्थिक डाव आहे.

​यामुळे कामगारांना मुंबईत सोडाच, पण मुंबईबाहेरही घर मिळणे भविष्यात कठीण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली आहे. मराठा समाजाचे मोठे वास्तव: कामगार नेत्यांकडूनही साथ नाही! जाधवराव यांनी या भूखंडाशी जोडलेला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे. विशाल सह्याद्री नगरात राहणाऱ्या कुटुंबांपैकी ७०% पेक्षा जास्त समाज हा मराठा समाज आहे. आजही हे कष्टकरी लोक माथाडी कामगार म्हणून मिळेल ती मेहनत करत आहेत.

​”आज शोषित कामगारांना १२-१२ तास काम करून कापड बाजाराच्या गोडाऊन बाहेर हातगाडीवर झोपलेले आम्ही पाहिले आहेत. त्यांना हक्काची जागा मिळत असताना, त्यांचे हक्क अधिकार कामगार नेते देखील जपायला तयार नाहीत,” अशी खंत त्यांनी व्यक्त केली. ​कामगारांना स्वतःच्या हक्कांसाठी लढण्याची जाणिव नसल्याने आणि कामगार नेतेही साथ देत नसल्याने ही हक्काची जागा मोठ्या भांडवलदारांच्या घशात जाण्याची भीती आहे.

​अमोल जाधवराव यांनी ठामपणे सांगितले की, शिवराज्य ब्रिगेड आणि मराठा क्रांती मोर्चाचा विकासाला अजिबात विरोध नाही. परंतु, ज्या धोरणांमुळे वंचित, कष्टकरी, पीडित व्यक्तीला न्याय मिळणार नाही, जी धोरणे कामगार विरोधी असतील, त्याला कायम विरोध करण्याची भूमिका आपण घेतली आहे. ​या संवेदनशील प्रश्नावर आता सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी राजकारण न करता, माथाडी कामगारांना न्याय देण्यासाठी ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!