कबुतरखाना बंदीविरोधात जैन समाजाचा इशारा

मुंबई / रमेश औताडे
महानगरपालिकेकडून मुंबईतील कबुतरखाना बंद केल्यामुळे शांततेचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या हजारो कबुतरांचा मृत्यू झाला आहे. या घटनेविरोधात समाजात करुणा, अहिंसा आणि प्राणिमात्रांवरील दयेचा संदेश पोहोचवण्यासाठी “कबुतरांना वाचवा, मनःशांतीसाठी एक विशाल धार्मिक बैठक” आयोजित करण्यात आली आहे. मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महावीर मिशन ट्रस्टचे संस्थापक आणि प्रसिद्ध गोरक्षक राष्ट्रीय संत मुनी नीलेश चंद्र विजयजी यांनी माध्यमांशी संवाद साधला. या वेळी सुरेश पुनमिया, राकेश कोठारिया तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
मुनी नीलेश चंद्र विजयजी म्हणाले, “कबुतरखाना बंद केल्यामुळे अनेक निष्पाप कबुतरांचा मृत्यू झाला आहे. हे समाजातील करुणा, अहिंसा आणि जीवनाच्या पावित्र्यावर गंभीर प्रश्नचिन्ह आहे. या विषयावर सरकारने तातडीने दखल घ्यावी.” या पार्श्वभूमीवर ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८:३० वाजता योगी सभागृह, मुंबई येथे “विशाल धार्मिक बैठक” आयोजित करण्यात आली आहे. या धर्मसभेत सकला जैन समाज, राजस्थानी छत्तीस कोम, महावीर मिशन ट्रस्ट, शेरी अँड दिया फाउंडेशन, कुलाबा सकल जैन संघ, जैन आंतरराष्ट्रीय सेवा संघटना (JISO) फाउंडेशन तसेच विविध समाजांचे संत उपस्थित राहणार आहेत. मुनी नीलेश चंद्र विजयजी यांनी स्पष्ट केले की, जर या बैठकीनंतरही सरकारकडून न्याय मिळाला नाही, तर दिवाळीनंतर आमरण उपोषण करण्याचा निर्णय घेण्यात येईल.