राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल वादग्रस्त विधान करणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक

रायपूर – राष्ट्रपिता महात्मा गांधींबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन अपशब्द वापरणाऱ्या कालीचरण महाराजांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेशात ही अटकेची कारवाई करण्यात आली आहे. छत्तीसगडच्या रायपूर पोलिसांनी खजुराहो येथून कालीचरण महाराजांना अटक केली आहे. कालिचरण यांच्या महात्मा गांधींबद्दल विधानामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टिका करण्यात आली होती.
काही दिवसांपूर्वी रायपूर येथे झालेल्या धर्मसंसदेत कालीचरण यांनी महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे गोडवे गायले होते. या वक्तव्यावरून सर्वच स्तरातून त्यांच्यावर टिका झाली होती. तसेच राष्ट्रवादीचे नेते डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी कालिचरण महाराजांविरोधात स्वतः जाऊन पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्याचप्रमाणे त्यांच्यावर अनेक लोकांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. अखेर आज कालीचरण महाराज यांना अटक करण्यात आली आहे.
छत्तीगडची येथील धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मी नथूराम गोडसे यांना सलाम करतो की त्यांनी महात्मा गांधींची हत्या केली. असे वादग्रस्त विधान कालीचरण महाराज यांनी केले आहे. कालीचरण महाराज यांनी केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात काँग्रेससह इतर सामाजिक संघटनांनी गुन्हा दाखल केला आहे.