महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या ‘बस’ समस्यांवर ‘हेल्पलाईन’ची प्रभावी मात्रा….३०८ तक्रारींवरून एसटी प्रशासनाला नवी दिशा!

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) बससेवेवर अवलंबून असलेल्या लाखो शालेय विद्यार्थ्यांसाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकताच सुरू केलेला टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००२२१२५१ हा एक महान आधार ठरला आहे. विद्यार्थ्यांची सोय आणि सुरक्षितता हा उदात्त हेतू ठेवून सुरू केलेल्या या हेल्पलाईनवर, अवघ्या काही दिवसांत (आठवड्यात) तब्बल ३०८ तक्रारींची नोंद झाली आहे.


ही आकडेवारी तात्पुरती चिंता दर्शवत असली तरी, ती एसटी प्रशासनाला मूलभूत त्रुटी सुधारण्यासाठी मिळालेली एक सुवर्णसंधी आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

प्रमुख तक्रारी: आता थेट ‘ॲक्शन’ मोडमध्ये!

नोंदवलेल्या तक्रारींमध्ये खालील गंभीर समस्या प्रामुख्याने समोर आल्या आहेत, ज्या आता थेट मंत्र्यांच्या निदर्शनाखाली आल्या आहेत:

वेळेवर बस न येणे: यामुळे होणारे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आता गांभीर्याने घेतले जात आहे.

बस थांब्यावर न थांबणे:

नियोजित थांब्यांवरही बस थांबत नसल्याच्या तक्रारींवर तातडीने लक्ष केंद्रित.

पासधारकांना प्रवेश नाकारणे:

लांब पल्ल्याच्या बसमध्ये पासधारक शालेय विद्यार्थ्यांना चढण्यास मनाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईची तयारी.

मंत्र्यांचा कठोर निर्णय: जबाबदारी निश्चित!

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या तक्रारींची गांभीर्याने दखल घेतली असून, त्यांनी तात्काळ हेल्पलाईन सुरू करून विद्यार्थ्यांचे म्हणणे थेट प्रशासनापर्यंत पोहोचवले आहे. यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे, शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास संबंधित आगार व्यवस्थापक व पर्यवेक्षकांना निलंबित करण्याच्या कठोर सूचना त्यांनी दिल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये ‘ कामाला न जुमानल्यास कठोर कारवाई ‘ करण्याची मानसिकता निर्माण होऊन व्यवस्थेत सकारात्मक बदल होत आहेत
.
पुढील वाटचाल: तक्रार पेटी नव्हे, १००% निराकरण केंद्र!

एसटी महामंडळाने आता केवळ हेल्पलाईनवर तक्रारींची नोंद न घेता, या ३०८ तक्रारींचा आधार घेऊन मूलभूत कामकाजात आणि कर्मचारी मानसिकतेत त्वरित सकारात्मक सुधारणा कराव्यात.असे निर्देश मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत.

विद्यार्थ्यांच्या प्रवासातील अडचणी दूर करणे हे एसटी महामंडळाचे सामाजिक आणि नैतिक कर्तव्य आहे. मंत्री महोदयांनी आता तक्रारींच्या ‘१००% निराकरणावर’ लक्ष केंद्रित केल्यास, हा हेल्पलाईन क्रमांक केवळ “तक्रार पेटी” न राहता, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित, वेळेवर आणि सन्मानजनक प्रवासाची खात्री देणारे ‘विश्वास केंद्र’ बनेल. असे मत विद्यार्थी व त्यांच्या पालकांनी व्यक्त केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!