‘हिंदू आणि हिंदुत्व’ एकच! राहुल गांधी यांच्या विधानाचा आरएसएस नेत्याने घेतला समाचार

मुंबई- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते सुरेश भैय्याजी जोशी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या हिंदुत्ववादावर केलेल्या वक्तव्यावर सडकून टीका केली आहे.हिंदू आणि हिंदुत्व वेगळे नाही असे सुरेश भैय्याजी जोशी यांनी म्हटले आहे. नाव न घेता संघाचे सुरेश जोशी यांनी हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातील फरकाबद्दल बोलल्याबद्दल काँग्रेसनेते राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींवर टीका करताना राहुल गांधींनी, हिंदुत्ववादी गंगेत एकटाच स्नान करतो. हिंदू करोडो लोकांसह गंगेत स्नान करतात. एक बाजू हिंदू, तर दुसरी बाजू हिंदुत्ववादी. एक बाजू खरी, दुसरी बाजू खोटी. हिंदू खरे बोलतात, हिंदुत्ववादी खोटे बोलतात, असे वक्तव्य केले होते. पंतप्रधान मोदींनी गेल्या आठवड्यात काशी विश्वनाथ कॉरिडॉरचे उद्घाटन करताना गंगेत स्नान केले होते. राहुल गांधी यांनी यापूर्वी जयपूरमधील ‘महागाई हटाओ रॅली’मध्ये हिंदू विरुद्ध हिंदुत्व या मुद्द्यावरून भाजपा सरकारला घेरले होते.
राजस्थानमध्ये काँग्रेसच्या महागाईविरोधातील रॅलीत राहुल गांधींनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली होती. रॅलीला संबोधित करताना ते म्हणाले की, जनता देश चालवत नाही. तीन-चार भांडवलदार चालवत आहेत आणि पंतप्रधान त्यांचे काम करत आहेत. देशाच्या राजकारणात दोन शब्दांची टक्कर आहे. एक शब्द हिंदू आणि दुसरा शब्द हिंदुत्व. देशातील महागाईचे कारण हिंदुत्व असल्याचे राहुल गांधी म्हणाले. यासोबतच राहुल गांधींनी महागाईवरूनही केंद्र सरकारवर निशाणा साधला.