कृषीवार्तामहाराष्ट्र

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारची चालढकल.. विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल..!

दि.३०,उस्मानाबाद : राज्यात मोठया प्रमाणात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेतात गुडघाभर पाणी साचले आहे. हे पाणी ओसरायला किमान 3 महिने लागतील. मात्र सरकारकडे आर्थिक चणचण असल्याने ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार चालढकल करत असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला.

शेतकऱ्यांच्या प्रलंबित पीक विम्यासाठीचे उपोषण स्थगित केल्यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांच्यासोबत धाराशिवमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानाची पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते.

एखादं फ्यूज उडालं तरी ते लावण्यासाठी सरकारकडे पैसे नाही असे कृषिमंत्र्यांनीच म्हटलं आहे. सरकारला मायबाप म्हटलं जातं, म्हणून त्यांनी शेतकऱ्यांची हलाखीची परिस्थिती पाहता
ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी केंद्राची मदत घेतली पाहिजे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी मागणी दानवेंनी केली.

धारशिवमधील आंबेजवळगा व कौडगाव येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन दानवे यांनी शेतीच्या नुकसानाची पाहणी केली असता, त्या शेतात गेल्या एक दीड महिन्यापासून पाणी साचल्याने सोयाबीन पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसून आले.

शेतकऱ्याच्या कुटुंबियाला दिला मदतीचा हात

कारी ता.धाराशीव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी
लक्ष्मण वाघे यांच्या घरी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी भेट देऊन कुटुंबियांचे सात्वंन केले. शिवसेना दुःखात उघड्यावर सोडणार नाही,आपल्या सदैव पाठीशी असून मदतीसाठी तत्पर असल्याची भावना त्यांनी व्यक्त करत वाघे यांच्या कुटुंबियाला २५ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली.

यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर,आमदार कैलास पाटील,मराठवाडा विभागीय सचिव अशोक पटवर्धन,जिल्हाप्रमुख अनिल जगताप,विधानसभा संघटक राजू वैद्य, तहसिलदार गणेश माळी,तालुका कृषी अधिकारी श्री जाधव,अमोल जाधव,चंद्रकात वाघे सह शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: Content is protected !!