आपल्या शरीरातील लाल रक्तपेशी आवश्यक प्रमाणापेक्षा कमी होतात, तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. त्या वेळी अशक्तपणा जाणवतो. त्याला ॲनिमिया असं म्हणतात. शरीरात लोहाची कमतरता निर्माण झाल्याने रक्त कमी होतं. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणण्यानुसार जगातले जवळजवळ 80 टक्के नागरिक लोहाच्या कमतरतेनं ग्रस्त असतात, तर 30 टक्के नागरिक ॲनिमियाग्रस्त असतात.
शरीरात रक्त कमी झाल्यास चक्कर येणं, अशक्तपणा, बेशुद्ध पडणं यासारख्या समस्या उद्भवतात. आपल्याला सतत थकवा जाणवत असेल किंवा चक्कर येत असेल किंवा डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास, डोकेदुखी, रक्तवाहिन्यांमध्ये रक्तप्रवाह वेगानं होणं, हात-पाय नेहमीच थंड असणं अशी लक्षणं दिसत असतील तर शरीरातलं रक्त कमी झालं असण्याची शक्यता असते. त्याकडे दुर्लक्ष करून उपयोग नाही. त्यावर वेळीच उपचार करणं गरजेचं आहे. त्यावर योग्य वेळी उपचार केले गेले नाहीत, तर बरेच गंभीर आजारदेखील उद्भवू शकतात. उपचारांसाठी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
तसंच आहार समावेशक होण्यासाठी आहारतज्ज्ञांचा सल्लाही जरूर घ्यावा. त्यामुळे तुमच्या शरीराची नेमकी गरज ओळखून त्यानुसार आहार ठरवता येऊ शकतो आणि तो घेता येऊ शकतो.
काळ्या मनुका
रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी काळ्या मनुका अत्यंत उपयुक्त ठरतात. 4 ते 5 मनुका कोमट पाण्यानं चांगल्या धुवाव्यात आणि नंतर त्या दुधात घालून ते दूध उकळवावं. त्यानंतर दूध कोमट असताना ते प्यावं. तुम्हाला अधिक प्रभावी आणि वेगाने गुण मिळायला हवा असेल, तर दिवसातून दोनदा असं मनुका घातलेलं दूध प्यावं. काळ्या मनुका शरीरात रक्त निर्मितीस मदत करतात. त्यामुळे रक्ताचं प्रमाण वाढतं आणि अशक्तपणा दूर होतो.
पालक
पालकाच्या (Spinach) भाजीत लोहाचं प्रमाण भरपूर असतं. त्यामुळं शरीरातली रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी त्याचा खूप फायदा होतो. पालक भाजीच्या स्वरूपात खाऊ शकता किंवा त्याचं सूप करूनदेखील पिऊ शकता.
टोमॅटो
टोमॅटोही (Tomato) शरीरातली रक्ताची कमतरता दूर करण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. दररोज कोशिंबिरीच्या किंवा भाजीच्या स्वरूपात टोमॅटो खाता येतो. टोमॅटोचं सूपही करून पिता येतं.
केळी
केळ्यांमध्ये (Banana) लोह आणि पोटॅशियम हे घटक मोठ्या प्रमाणात असतात. हे दोन्ही घटक आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतात. यामुळे शरीरात रक्त वेगानं तयार होतं आणि अशक्तपणाची तक्रार दूर होते.






